Skip to content Skip to footer

हॉकीतील 86 वर्षांचा विक्रम मोडीत 

जकार्ता : भारताने पुरुष हॉकीतील धडाका कायम राखताना हॉंगकॉंग चीनचा 26-0 असा धुव्वा उडवला. भारताने आपला सर्वाधिक मोठ्या विजयाचा 86 वर्षांचा विक्रम मोडण्यात यश मिळवले, त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वात मोठा विजयही संपादन केला.

दोन दिवसांपूर्वी भारताने यजमान थायलंडला 17-0 असे हरवले होते, त्या वेळी स्पर्धा इतिहासातील पाकिस्तानच्या सर्वांत मोठ्या विजयाची बरोबरीच झाली होती. मात्र या वेळी भारतीय हॉकी संघाने जास्तच आक्रमक खेळ केला. भारताने अमेरिकेतील ऑलिंपिकमध्ये यजमानांना 24-1 हरवले होते. तो विक्रम आज मागे पडला.

एकंदर पाच गोल करणाऱ्या रुपिंदर पाल सिंगने तिसऱ्या मिनिटास खाते उघडले आणि 59 व्या मिनिटास भारताचा अखेरचा गोलही केला. त्याच्याचबरोबर हरमनप्रीतने चार, तर आकाशदीप सिंगने तीन गोल केले. याशिवाय मनप्रीत सिंग, ललित उपाध्याय, वरुण कुमारने दोन, तर एस. व्ही. सुनील, विवेक सागर प्रसाद, मनदीप सिंग, अमित रोहिदास, दिलप्रीत सिंग, चिंगलसेना सिंग, सिमरनजीत सिंग आणि सुरेंदर कुमारने प्रत्येकी एक गोल केला.

जागतिक क्रमवारीत पाचवे असलेल्या भारताने 45 व्या क्रमांकावरील हॉंगकॉंगला कोणतीही दयामाया दाखवली नाही. पहिल्या पाच मिनिटांत चार गोल केलेल्या भारतीयांनी विश्रांतीस 14-0 आघाडी घेतली होती. तिसऱ्या सत्रात मायकेल चुंगने भारतीय गोलधडाका काहीसा रोखल्यामुळे भारतीय जागतिक विक्रमापासून दूर राहिले.

आशिया देशात सर्वात मोठा
भारताने हॉंगकॉंगविरुद्ध मिळवलेला विजय हा हॉकीतील सर्वाधिक मोठ्या विजयात अकराव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडने पापुआ न्यू गिनीविरुद्ध 39-0 असा विजय संपादला होता, असे हॉकी सांख्यिकी तज्ज्ञ बी. जी. जोशी यांनी सांगितले. मात्र हॉकीत सर्वात मोठा विजय मिळवलेल्या आशियाई क्रमवारीत भारत अव्वल आहे, असेही त्यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5