Skip to content Skip to footer

वापरकर्त्यांचा ‘पाठलाग’ केल्याबद्दल गुगलवर खटला

लोकांच्या खासगी जीवनात घुसखोरी करून त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवल्याबद्दल जगप्रसिद्ध कंपनी गुगलवर खटला दाखल करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांनी अनेक संशोधनांचा हवाला देऊन गुगलने हे गैरकृत्य केल्याचा दावा केला आहे.

कॅलिफोर्नियातील एका व्यक्तीने अमेरिकेच्या संघीय न्यायालयात शुक्रवारी हा खटला दाखल केला. स्मार्टफोनमधील लोकेशन हिस्टरी बंद केल्यानंतरही वापरकर्त्यांचा ठावठिकाणा गुगल शोधून काढते, हे अलीकडच्या संशोधनातून उघड झाले होते. त्या पार्श्वभूमीवर हा खटला दाखल झाला आहे. मात्र त्यात किती नुकसानभरपाई मागितली हे उघड झालेले नाही, असे एएफपी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

या संदर्भात वृत्तसंस्थेने गुगलकडे प्रतिक्रियेसाठी विचारणा केली होती मात्र गुगलने कोणतेही उत्तर दिले नाही.
‘अँड्रॉईड ही ऑपरेटिंग सिस्टिम आणि काही अॅप्समधील विशिष्ट सेटिंग बंद केल्यानंतर वापरकर्त्यांचा ठावठिकाणा शोधण्यात येणार नाही, असे गुगलने स्पष्टपणे म्हटले होते. मात्र गुगलचा हा दावा खोटा होता,’ असे या याचिकेत म्हटले आहे.

प्रिन्सेटन येथील संगणक शास्त्राचे संशोधक आणि असोसिएटेड प्रेस संस्थेने केलेल्या संशोधनात गुगल आपले लोकेशन रेकॉर्ड करते याला दुजोरा मिळाला होता. अँड्रॉईड मोबाईलमध्ये कितीही प्रायव्हसी सेटिंग केली तरीही वापरकर्त्याचे लोकेशन गुगल नोंदवून ठेवते, असे त्यात आढळले होते.

Leave a comment

0.0/5