महाराष्ट्र बुलेटिन : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा दुसरा सामना पुणे येथील मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केएल राहुलच्या शतकी आणि कर्णधार कोहली आणि ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या आधारे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ३३६ धावा केल्या आणि इंग्लंडला विजयासाठी ३३७ धावांचे लक्ष दिले.
केएल राहुलचे शतक
रोहित शर्मा आणि शिखर धवनने भारताच्या डावाची सुरुवात केली, पण भारताला अवघ्या ९ धावांच्या स्कोरवर शिखर धवनच्या रूपात पहिला झटका बसला. शिखरने १७ चेंडूत ४ धावा करत रीस टॉप्लेच्या चेंडूवर बेन स्टोक्सकडे झेल दिला. रोहित शर्माला २५ धावांवर सॅम कुर्रनने बाद केले. भारतीय कर्णधार विराट कोहलीने ६२ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. विराट कोहली ६६ धावांवर आदिल रशीदच्या चेंडूवर बाद झाला.
केएल राहुलच्या रूपात भारतीय संघाचा चौथा बळी गेला. ११४ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०८ धावांच्या शानदार खेळीनंतर तो बाद झाला. टॉम कुर्रनच्या चेंडूवर टॉप्लेने त्याचा बाउंड्रीवर झेल टिपला. ऋषभ पंतने ७७ धावा केल्या तर हार्दिक पांड्या ३५ धावांवर बाद झाला. क्रुणाल पांड्या १२ धावा करुन नाबाद राहिला.
या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात तीन बदल पाहायला मिळाले, तर भारतीय संघात केवळ एकच बदल पाहायला मिळाला. इयोन मॉर्गनच्या जागी इंग्लंडने डेव्हिड मलानला संधी दिली. मार्क वूडच्या जागी रीस टॉप्लेला संधी मिळाली, तर सॅम बिलिंग्जची जागा लियाम लिव्हिंगस्टोनने घेतली. दुसरीकडे भारतीय संघाने श्रेयस अय्यरच्या जागी ऋषभ पंतला संधी दिली.
भारताची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन
जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, डेव्हिड मलान, जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुर्रन, आदिल रशीद, रीस टॉप्ले आणि टॉम कुर्रन.