Skip to content Skip to footer

ऑस्ट्रेलियाच्या ‘तारणहारा’ला संघातील स्थान गमावण्याची भीती!

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करताना दोन विजय मिळवले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ऑसींची सलामीची फळी ढेपाळली, परंतु स्टीव्हन स्मिथनं (73) संयमी खेळ करताना संघाचा डाव सावरला. त्याला अॅलेक्स कॅरी ( 45) आणि नॅथन कोल्टर नील ( 92) यांची तुल्यबळ साथ लाभल्यानं ऑस्ट्रेलियाने 288 धावांचा समाधानकारक पल्ला गाठला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला 273 धावा करता आल्या. या सामन्यातील विजयाचा शिल्पकार आणि ऑसींचा तारणहार कोल्टर नील याला आपण पुढील सामन्यात संघाबाहेर बसण्याची भीती वाटत आहे.

विंडिजच्या अनपेक्षित कामगिरीनं ऑसींच्या सलामीच्या चार फलंदाजांना अवघ्या 38 धावांवर माघारी पाठवले होते. पण, स्मिथनं एका बाजूनं चिकाटीनं खेळ करताना अन्य सहकाऱ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळेच कॅरीनं  55 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीनं 45 धावा केल्या. स्मिथनंही 103 चेंडूंत 7 चौकारांसह 73 धावा केल्या. पण, कोल्टर नीलनं विंडिजच्या गोलंदाजांची पिसं काढली. त्यानं 60 चेंडूंत 8 चौकार व 4 षटकार खेचून 153.33 च्या स्ट्राईक रेटनं 92 धावा चोपल्या. पण, भारताविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळेल की नाही याची त्याला भीती वाटत आहे.

तो म्हणाला,”मला संघात 70 धावा करण्यासाठी घेतलेलं नाही. आमच्याकडे जगातील सर्वोत्तम दोन जलदगती गोलंदाज आहेत. धावा करण्याची जबाबदारी ही आघाडीच्या फळीची आहे. त्यामुळे पुढील सामन्यात मला बाकावर बसावं लागलं, तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही. संघाल विकेट मिळवून देणं ही माझी जबाबदारी आहे आणि दोन सामन्यांत मला विकेट घेता आलेली नाही. त्यामुळे संघातील माझे स्थान अबाधित नाही.”

डेव्हिड वॉर्नरच्या फटक्यानं भारतीय गोलंदाज गंभीर जखमी
वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ रविवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवून त्यांना हलक्यात लेखण्याची चूक करणाऱ्यांना इशारा दिला आहे. पण, भारताचा सामना करण्यासाठी ऑसी संघ तितक्याच ताकदीनं मैदानावर उतरण्यास सज्ज होत आहेत. रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी नेटमध्ये कसून सराव केला. याच सराव सत्रात डेव्हिड वॉर्नरने टोलावलेला चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावर आदळला. भारतीय वंशाच्या या गोलंदाजाला त्वरीत उपचारासाठी स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.

Leave a comment

0.0/5