Skip to content Skip to footer

IND vs ENG: वनडेमध्ये देखील भारतानं इंग्लंडला चारली धूळ, ‘हे’ ५ खेळाडू ठरले मालिका विजयाचे ‘हिरो’

महाराष्ट्र बुलेटिन : कसोटी आणि टी-२० सारख्या एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघाने इंग्लंडला धूळ चारली. भारताने ४ सामन्यांची कसोटी मालिका ३-१ ने जिंकली, त्यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-२ ने जिंकली आणि वनडे मालिकेत २-१ असा शानदार विजय मिळविला. मालिकेच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

केएल राहूल

भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल टी-२० मालिकेत फ्लॉप ठरला आणि त्याच्यावर बरीच टीका झाली. परंतु एकदिवसीय मालिकेत राहुलने पुन्हा आपले सामर्थ्य दाखवून दिले आणि तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. त्याने ३ सामन्यात शतक आणि अर्धशतक झळकावत १७७ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेटही १०१.१४ आहे आणि सरासरी ८८.५० ची आहे.

ऋषभ पंत

भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने दुसर्‍या वनडे सामान्यापासून जोरदार कामगिरी करुन स्वत:ला सिद्ध केले. त्याने फक्त दोन सामने खेळले आणि एकूण १५५ धावा केल्या. मालिकेच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. एवढेच नव्हे तर त्याने आपल्या वन डे कारकीर्दीतील (तिसर्‍या वनडेमध्ये ७८ धावा) सर्वोत्कृष्ट स्कोअरही केला. या एकदिवसीय मालिकेत भारताच्या सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याचा स्ट्राइक रेटही १५१.९६ चा राहिला.

शिखर धवन

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शिखर धवनने देखील या मालिकेत आपले हात उघडले आणि ३ पैकी दोन सामन्यात अर्धशतक ठोकले. त्याने एकूण १६९ धावा केल्या ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ९८ होती. त्याने ५६.३३ च्या सरासरीने धावा केल्या आणि त्याचा स्ट्राइक रेटही ९४.४१ चा राहिला. मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो एकूणच तिसरा फलंदाज होता.

शार्दुल ठाकूर

मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने एकदिवसीय मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. तिसर्‍या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात तर त्याने धमाकाच केला आणि रीस टॉपले, मार्क वुड, बेन स्टोक्स सारख्या दिग्गजांच्या चेंडूंवर षटकार तर ठोकलेच परंतु विकेट घेण्यासही मागे राहिला नाही. या मालिकेत तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज देखील ठरला. त्याने एकूण ७ बळी घेतले ज्यामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ६.७२ चा राहिला.

भुवनेश्वर कुमार

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीनंतर मालिकेत परतला. त्याने टी-२० मालिकेचे पाच सामने खेळले आणि त्यानंतर वन डे मालिकेतही त्याने संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जेव्हा जेव्हा संघाला त्याची गरज भासली तेव्हा भुवीने बळी घेतले. एकदिवसीय मालिकेत त्याचा इकॉनॉमी रेट सर्वोत्कृष्ट ४.६५ चा राहिला. त्याने ३ सामन्यांच्या मालिकेत एकूण ६ बळी घेतले. युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने देखील ६ गडी बाद केले.

Leave a comment

0.0/5