Skip to content Skip to footer

आज प्रचाराच्या तोफा थंडावणार

आज प्रचाराच्या तोफा थंडावणार
गेल्या बारा दिवसांपासून सुरु असलेली विधानसभा निवडणुकीची प्रचाराची सांगता आज सायंकाळी पाच वाजता होत आहे. त्यामुळे मोठ्या सभा, गावसभा, पदयात्रा, मोटरसायकल रॅली, मतदार संवाद अशा अनेकविविध कार्यक्रमांची रेलचेल सर्वच दहा विधानसभा मतदार संघात होती. प्रचारासाठी काही तास उरल्याने उमेदवार आणि समर्थकांची अक्षरश: लगिनघाई सुरु आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच प्रमुख उमेदवारांनी मोठी रॅली काढून शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे.
जिल्ह्यातील बहुतांशी मतदारसंघांत प्रमुख उमेदवारांत अस्तित्वाची लढाई सुरू आहे. परिणामी साम, दाम, दंड, भेद असे कोणत्याही गोष्टीत कमी पडायचे नाही, असे उमेदवारांचे प्रयत्न आहेत. निवडणुकीच्या जाहीर प्रचाराला अवघे काही तास उरल्याने तो कॅश करण्यासाठी उमेदवार, त्यांचे समर्थक आणि कुटुंबियांनी पायाला भिंगरी बांधली आहे. गावागावांत, गल्लीबोळांत उमेदवारांचे विश्वासू यंत्रणा राबताना दिसत आहे

विधानसभा निवडणुकीचा प्रचारास ८ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. गेली अकरा दिवस जागोजागी होणाऱ्या कोपरा सभा-मेळावे, नेत्यांच्या पदयात्रा, समाजमाध्यमातून होणारा आक्रमक प्रचार, नेत्यांचे रोड शो आणि वाहनफेऱ्या, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, ध्वनिवर्धक लावलेल्या वाहनातून होणारा उमेदवारांचा प्रचार असे निवडणुकीतील राजकीय वातावरण भारले होते. प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. शनिवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करुन प्रचाराची सांगता करण्याची तयारी सर्वच प्रमुख उमेदवारांनी केली आहे.

उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यात मोठ्या गटांचा पाठिंबा मिळण्यावर लक्ष केंद्रीत आहे. शहरातील गल्ल्यां-बोळांबरोबरच ग्रामीण भागात थेट बांधावर जात मतदारांना साकडे घातले. गेल्या काही दिवसात ज्या ठिकाणी पोहचता आलेले नाही. ती ठिकाणे हेरून संपर्क करण्याची रणनिती आखली जात आहे. विरोधकांचे बलस्थान असलेल्या गावात-भागातील कार्यकर्त्यांसाठी जोडण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत.

Leave a comment

0.0/5