Skip to content Skip to footer

राज्यातून परतीच्या पावसाला आजपासून सुरुवात; हवामान विभागाची माहिती

पावसाच्या परतीच्या मार्गावर ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

यंदा पंधरा दिवस लांबलेल्या आणि जाता जाता देशभरात थैमान घालणाऱ्या परतीच्या पावसाला राज्यातून आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख दत्तात्रय होसाळीकर यांनी ही माहिती दिली.

 

होसाळीकर यांनी ट्विटद्वारे माहिती देताना म्हटलं की, “परतीच्या पावसाला महाराष्ट्रातून आजपासून सुरुवात झाली आहे. सूर्यप्रकाश आणि काहीशा ढगाळ वातावरणात विदर्भ, मराठवाड्यातील काही भागातून, उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही भागातून आणि उत्तर कोकणातून आजपासून पावसाने माघार घेतली आहे. परतीच्या पावसाचा हा प्रवास डहाणू, नाशिक, नांदेड आणि नलगोंडा (तेलंगाणा) आणि इतर भागातून होत आहे. या भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

 

घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे!

परतीचा पाऊसही निरोप घेताना भावनाविवश झाला असेल अशी कल्पना जर एखाद्या कवीनं केली तर ती “घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे” अशी असेल. खुद्द होसाळीकर यांनी या काव्यमय पंक्तींसह परतीच्या पावसाचं वर्णन केलं आहे.

 

२४ तासांत राज्यातील बहुतांश भागातून पाऊस परतेल

उत्तर महाराष्ट्रातून आजपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील २४ तासांत राज्यातील बहुतांश भागात परतीच्या पावसासाठी हवामानाची स्थिती अनुकूल असेल असेही होसाळीकर यांनी सांगितलं आहे.

Leave a comment

0.0/5