Skip to content Skip to footer

ईडीच्या चौकशीला घाबरून राणे पिता-पुत्रांचा भाजपात प्रवेश – वैभव नाईक

ईडीच्या चौकशीला घाबरून राणे पिता-पुत्रांचा भाजपात प्रवेश – वैभव नाईक

राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून अनेक आघाडी सरकारच्या अनेक मातबर नेत्यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, आमदार प्रताप सरनाईक यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सुद्धा ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यावर नारायण राणे यांनी राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर भाष्य करत टोला लगावला होता.

आता या टीकेला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. नारायण राणेंची ईडी चौकशी होणार या भीतीने त्यांनी सरळ भाजपमध्ये पळ काढला, त्यामुळे राणेंना संजय राऊत यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही”, अशी खरमरीत टीका आमदार नाईक यांनी केली आहे.

नारायण राणेंनी गेली दहा वर्षे अनेक आव्हाने आणि भविष्यवाणी केल्यात, काँग्रेसमध्ये असताना मी मुख्यमंत्री होणार त्यानंतर शिवसेना विसर्जित करणार, अशा वेगवेगळ्या घोषणा त्यांनी केल्या होत्या. या त्यांच्या घोषणांचे पुढे काय झाले हे लोकांना माहीत आहे, असं टीकास्त्रही वैभव नाईकांनी सोडले.

गेले एक वर्ष महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल, असं राणे अनेक वेळा म्हणाले होते. मात्र एक वर्षाच्या कालावधीनंतर हे सरकार अजून भक्कम झालंय. तसेच भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार हे पुन्हा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीत पुन्हा येतायत आणि पोटनिवडणूक लढवण्याची त्यांची मानसिकता तयारी झालीय, अशी माहितीही वैभव नाईकांनी दिली आहे.

Leave a comment

0.0/5