Skip to content Skip to footer

पुणे-नाशिक महामार्गावर “रॉंग साईड’ने वाहने सुसाट

भोसरी – पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी ते मोशी दरम्यान ‘शॉर्टकट’साठी विरुद्ध दिशेने बिनदिक्कतपणे वाहने हाकली जात आहेत. त्यामुळे अपघात होत असून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरुन चालावे लागते. विशेष म्हणजे पोलीस आयुक्‍तांनी ‘रॉंग साईड’ने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बक्षीस योजना जाहीर केली असतानाही कर्मचारी मात्र गांधारीच्या भूमिकेत आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक होते. त्यात भोसरी, चाकण, रांजणगाव आदी भागात जाणाऱ्या औद्योगिक परिसरातील अवजड वाहनांचे प्रमाण मोठे आहे. रस्त्याची स्थिती चांगली असल्याने वाहनांची वेग मर्यादा जास्त असते. परंतु, याठिकाणी स्थानिक लोकांच्या वापरासाठी सर्व्हिस रस्ता नसल्याने दोन-तीन किलोमीटरचा वळसा घालून यावे लागते. त्यामुळे वाहन चालक ‘शॉर्टकट’च्या नादात आपला जीव धोक्‍यात घालत आहेत. दिवस-रात्रं या रस्त्यावरून विरुद्ध दिशेने वाहने चालविली जातात. रात्रीच्या वेळी अशा वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत.

अचानक उलट दिशेने येणारे चारचाकी व दुचाकी वाहने यामुळे जोरात येणाऱ्या वाहनांचे नियंत्रण सुटून मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. स्पाईन रोड चौक, मोशी चौकात विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे सकाळी व सायंकाळी वर्दळीच्या वेळी वाहतूक कोंडी होते. याचा वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना त्रास तर आहेच परंतु, पादचाऱ्यांचाही जीव धोक्‍यात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यात कहर म्हणजे रिक्षा व्यावसायिक मनमानी पद्धतीने कुठेही रिक्षा थांबवितात. गंधर्वनगरी समोरील परिस्थिती भयावह आहे. याच ठिकाणी बस थांबा आहे. शालेय बसही थांबतात. अबाल-वृद्ध सारेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे त्रस्त आहेत.

नागरिकांच्या अपेक्षा…
– वाहतूक पोलिसांकडून कारवाईची गरज
– स्थानिक नागरिकांसाठी सर्व्हिस रस्त्याची आवश्‍यकता
– महामार्गावरून पादचारी पूलाची गरज
– अनधिकृतपणे थांबणाऱ्या रिक्षा, शालेय बसवर कारवाई करावी

या मार्गावरून मी दररोज सायकलवर प्रवास करतो. मात्र, उलट दिशेने चारचाकी व दुचाकी वाहने भर वेगाने ये-जा करतात. त्यामुळे येथून प्रवास करताना भीती वाटते. ही वाहतूक अशीच सुरू राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. वाहतूक विभागाने लक्ष देऊन वेळीच ही समस्या दूर करण्याची गरज आहे.

Leave a comment

0.0/5