पटना – विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याने 4 मार्च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ते वक्तव्य आता त्याला जड जाणार असल्याचे चित्र सध्या आहे. कारण त्याच्या या वक्तव्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील किशनगंज न्यायालयात भाजप नेते टिटू बडवाल यांनी ६ मार्चला हा खटला दाखल केला आहे. दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचा कन्हैय्या कुमार हा माजी अध्यक्ष आहे.
दरम्यान काही इंग्रजी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आगामी लोकसभा निवडणूक लढवून कन्हैय्या कुमारने राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याबाबत तमाम डाव्या संघटनांचे एकमत झाले आहे. कन्हैय्या कुमार बिहारमधील बेगुसराय या लोकसभा मतदारसंघातून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया अर्थात सीपीआयच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहे. तसेच, भाजप आणि नितीशकुमारांच्या जदयुच्या शक्तिशाली आघाडीविरोधात लढण्यासाठी काँग्रेस बिहारमध्ये आता डाव्यांची साथ घेऊन महाआघाडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही वृत्त आहे. पण स्वतः कन्हैय्या कुमार किंवा डाव्या पक्षांकडून अद्याप या वृत्ताबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. मात्र, काही दिवसांपूर्वीच खुद्द कन्हैय्यानेच आपण महाआघाडी झाल्यास निवडणूक लढण्यास तयार असल्याचे सूचक वक्तव्य केले होते.