Skip to content Skip to footer

Womens Day- शरीरसौष्ठव क्षेत्रात मराठी महिलेचा डंका

शरीरसौष्ठव या फिटनेसच्या खेळातही आता हिंदुस्थानी महिला मोठा भीमपराक्रम नोंदवू लागल्या आहेत. विशेषत: यंदा `मुंबई श्री’ स्पर्धेत मराठमोळ्या डॉक्टर मंजिरी भावसार यांनी आपल्या फिटनेस आणि पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करीत क्रीडा शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यंदाचा ‘मिस मुंबई’ किताब पटकावून आपल्या या उच्चशिक्षित मराठी भगिनीने बलवान शरीरयष्टी आणि फिटनेस असेल तरच गृहिणी संसाराचा गाडा समर्थपणे ओढून नेऊ शकते याचा धडाच महिलांना घालून दिलाय. आपले घर भले आणि आपला संसार भला असे धोरण अंगीकारून मराठी महिला आपल्या अंगचे कला-क्रीडा गुण वाया घालवतात, असे डॉ. मंजिरी यांचे स्पष्ट मत आहे.

मराठी महिलांनी चूल आणि मूल अवश्य सांभाळावे, पण फावल्या वेळात आपल्या शरीराच्या फिटनेससाठी तरी क्रीडा क्षेत्रात अथवा शरीरसौष्ठवासारख्या क्षेत्रात यावे, असे डॉ. मंजिरी याना वाटते. `गृहिणी फिट तर कुटुंब बलवान’ हा मंत्र लक्षात ठेवून मराठी महिलांनी शारीरिक आणि मानसिक फिटनेससाठी किमान जिममध्ये जाणे तरी सुरू करावे, असे आवाहनही भावसार यांनी केले आहे. हिंस्थानी पुरुष व्यायामपटूंनी शरीरसौष्ठवात `मिस्टर वल्र्ड’सारख्या किताबापर्यंत मजल मारलेली असताना हिंदुस्थानच्या दीपिका चौधरी आणि श्वेता राठोड यांनी आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवात हिंदुस्थानचा तिरंगा मानाने फडकावत ठेवला आहे. मुंबईची करुणा वाघमारे, अश्विनी वासकर, उत्तराखंडची दीपिका चौधरी, `लेडी सलमान’ म्हणून ओळखली जाणारी कोलकात्याची सोनाली स्वामी, मणिपूरची ममता देवी, मुंबईकर श्वेता राठोड, मणिपुरी रेबिता देवी आणि मित्र-मैत्रिणींकडून कुरुप अथवा पुरुषी शरीराची… अशा शब्दांत हेटाळणी पत्करणारी उत्तर प्रदेशची यशमिन माणक यांनी आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवात हिंदुस्थानची मान अभिमानाने उंचावणारी कामगिरी केली आहे. या फिटनेस आणि शरीरसौष्ठव क्षेत्रात चमकदार कामगिरी साकारणाऱ्या महिलांपासून प्रेरणा घेत मराठी युवती आणि महिलांनी फिटनेस अथवा खेळाच्या क्षेत्रात पदार्पण करावे, असे डॉ. मंजिरी यांना मनोमन वाटते. पण महिलांच्या या आगळ्या गगनभरारीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी अशा महिलांपाठी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

मिसेस भावसार ठरल्या यंदाच्या `मिस मुंबई’
यंदाची `स्पार्टन मुंबई श्री’ स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरली ती मुंबईकर पिळदार शरीरयष्टीच्या महिला स्पर्धंकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे. सौंदर्यवतीच्या ‘मिस मुंबई’ स्पर्धेत एफएसटी जिमच्या डॉ. मंजिरी भावसार विजेत्या ठरल्या. गतवर्षी अवघ्या दोन स्पर्धकांमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र या वेळी आरोग्य प्रतिष्ठानने अत्यंत अभूतपूर्वरीत्या आयोजित केलेल्या महिलांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकाराला सात खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे लक्षवेधी झालेल्या या स्पर्धेत मंजिरी यांनी तळवलकर्सच्या हीरा सोलंकीवर मात करीत आपले पहिलेवहिले मिस मुंबई जेतेपद संपादले. विशेष म्हणजे दहा वर्षांच्या शौर्यची आई असलेल्या डॉ. मंजिरी यांनी आपल्या नवऱ्याने दिलेल्या प्रोत्साहनाच्या जोरावर ही स्फूर्ती देणारी किमया करून दाखविली. गेल्या दोन वर्षांपासून घेतलेली मेहनत आणि पती भूषण याने दिलेल्या पाठबळामुळे मला हे शक्य झाल्याची मंजिरी यांची पहिली प्रतिक्रिया होती. `मिस मुंबई’ ही माझी पहिली पायरी आहे. मला माझ्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचवायचे आहे. त्यासाठी लागणाऱ्या मेहनतीसाठी आणि आव्हानांसाठी मी सज्ज आहे. या स्पर्धेत तळवलकर्स जिमची हीरा सोलंकी उपविजेती ठरली. तर 52 वर्षांची तरुणी निशरिन पारिख तिसरी आली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सात महिला स्पर्धकांच्या प्रदर्शनाला उपस्थित महिलांनी भरभरून दाद दिली. तसेच या स्पर्धेत चंदिगड येथे झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या अमला ब्रम्हचारी आणि श्रद्धा डोके या मऱ्हाटमोळ्या पीळदार शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या सौष्ठव प्रदर्शनाने उपस्थितांची मनं जिंकली.

मराठमोळ्या महिला टॉप टेन शरीरसौष्ठवपटूंमध्ये
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवात आपली चमक दाखवणाऱ्या अनेक महिला शरीरसौष्ठवपटूंनी देशातील टॉप टेन महिला शरीरसौष्ठवपटूत स्थान मिळवले आहे. त्यात मुंबईकर श्वेता राठोड ही आठव्या स्थानी आहे. तर अतिशय प्रतिवूâल परिस्थितीत फिटनेस क्षेत्रात नाव कमावणाऱ्या 44 वर्षीय करुणा वाघमारेने मिस इंडिया 2015, मिस इंडिया फिटनेस फिसिक 2012 या मानाच्या किताबांसह अनेक मानाची जेतेपदे पटकावली आहेत.

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने करुणाचे पालकत्व आणि तिच्या शरीरसौष्ठव कारकिर्दीसाठी भविष्यातील खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. काही वर्षांपूर्वीच कोकणातून नोकरीसाठी आलेल्या अश्विनी वासकरने केंद्रीय मस्त्योद्योग संशोधन केंद्रात नोकरी सांभाळून राष्ट्रीय महिला शरीरसौष्ठवावर आपल्या कामगिरीची छाप सोडली आहे. मातृत्वानंतरही अश्विनीने शरीसौष्ठवातील आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. या महिला स्टार शरीरसौष्ठवपटूंपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील गृहिणींनीही आपला फिटनेस वाढवण्यासाठी तरी शरीरसौष्ठवाच्या क्षेत्रात उतरावे, असे डॉ. मंजिरी यांना वाटते. कारण अशा सहभागाने त्यांना फिटनेस तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ आणि शारीरिक शिक्षण क्षेत्रात आपली करिअर करता येईल, असाही मिस मुंबई भावसार यांना विश्वास वाटतो.

न्यूनगंड सोडल्यास यशाचे शिखर
मराठमोळ्या महिलांनी शरीरसौष्ठवातील तोकड्या गणवेशाबाबत मनातील न्यूनगंड सोडायला हवा. कारण प्रत्येक खेळाचा विशिष्ट गणवेश असतो. तसाच शरीरसौष्ठवात महिलांना बिकिनीवर सर्वांसमोर यावे लागते. त्यामुळे अनेक महिला आणि युवती जिममध्ये नियमित जात असूनही स्पर्धात्मक शरीरसौष्ठवात उतरणे नापसंत करतात.

मुलींचे आई-वडील, भाऊ, गृहिणीचा पती व अन्य सासरच्या मंडळींनी महिलांना घरापासूनच उत्स्फूर्त पाठिंबा दिला तर भविष्यात महाराष्ट्राची महिला जागतिक पातळीवर शरीरसौष्ठवात ‘मिस वर्ल्ड’ अथवा ‘मिस युनिव्हर्स’ किताबापर्यंत मजल मारू शकेल असा विश्वास व्यवसायाने होमिओपॅथी डॉक्टर असणाऱ्या मंजिरी भावसार यांना आहे. त्यांचे डॉक्टर पती भूषण भावसार आणि घरच्या सदस्यांच्या पाठिंब्यामुळेच त्या स्पर्धात्मक शरीरसौष्ठवात उतरल्या आणि त्यांनी ‘मिस मुंबई’ किताबही पटकावला. विमेन्स फिजीक स्पोर्टस् गटात एफएसटी जिमच्या डॉ. मंजिरी भावसार यांनी अफलातून फिजिकचे प्रदर्शन करीत ‘मिस मुंबई 2019 श्री’ हा किताब पटकावला. त्यांना अंतिम फेरीत आव्हान दिले ते तळवलकर्स जिमच्या हीरा सोलंकी, निशरीन पारीख, आर. के. फिटनेसच्या रेणुका मुदलीयार, बॉडी वर्कशॉपच्या वीणा महाले आणि बालमित्र व्यायामशाळेच्या प्रतीक्षा करकेरा या महिला शरीरसौष्ठवपटूंनी.

एवूâणच शरीसौष्ठवासारख्या पुरुषी वर्चस्वाच्या खेळात आता हिंदुस्थानातील अन्य महिलांप्रमाणे मराठी महिलाही आपले कर्तृत्व सिद्ध करू लागल्या आहेत. उच्चशिक्षित आणि गृहिणीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या मराठमोळ्या महिलाही शरीरसौष्ठवासारख्या खेळात राज्याचे आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याची जिद्द व्यक्त करू लागल्या आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. पिळदार आणि बलदंड शरीर ही केवळ पुरुषांचीच मक्तेदारी नाही याचे प्रत्यंतर आता शरीरसौष्ठवात पुरुषांच्या बरोबरीने चमकदार कामगिरी करणाऱ्या हिंदुस्थानी रणरागिणी आणून देत आहेत. महाराष्ट्राच्या फिटनेसबहाद्दर महिलाही आता या क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत ही आपणा महाराष्ट्रवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

शरीरसौष्ठवात महिलांचा सहभाग वाढतोय ही आनंदाची बाब -अजय खानविलकर
देशात आणि विशेषत: महाराष्ट्रातील शरीरसौष्ठव स्पर्धांत महिलांचा सहभाग वाढतोय ही खरेच आनंदाची बाब आहे. मराठी युवतींनी लष्कर आणि निमलष्करी दलातही भरती होऊन आपल्या पराक्रमाचे दर्शन देशवासीयांना घडवावे अशी आमची इच्छा आहे. पण त्यासाठी मराठी मुलींनी शरीरसौष्ठव, कुस्ती आणि मार्शल आर्टस्सारख्या क्रीडा प्रकारात भाग घ्यायला हवा. कारण अशा खेळातूनच तुम्हाला शरीर कमविण्यासोबत साहस आणि स्वसंरक्षणाचे गुण आत्मसात करता येणार आहेत, अशी प्रतिक्रिया पश्चिम हिंदुस्थान शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस अजय खानविलकर यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, यंदाच्या `मुंबई श्री 2019′ स्पर्धेत मराठी महिला स्पर्धकांचा मोठा सहभाग होता. आता टिटवाळा येथे 5 ते 6 मार्च 2019 या कालावधीत पार पडणाऱ्या ‘महाराष्ट्र श्री 2019’ स्पर्धेतील महिला फिजिक गटात किमान 15 महिला स्पर्धक सहभागी होतील, असा आम्हाला विश्वास आहे. शरीरसौष्ठवात सहभागी होणाऱ्या महिलांना स्पर्धा संयोजक आणि स्पर्धेला उपस्थित हजारो क्रीडा शौकीन यांच्याकडून आदराचीच वागणूक मिळते आणि यापुढेही मिळत राहील, असा मला विश्वास आहे.

Leave a comment

0.0/5