Skip to content Skip to footer

महाजन नगरमध्ये दाखल; सुजय विखेंच्या उमेदवारीवर आज फैसला

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील राजकारण आज एका वेगळ्या वळणावर येवून थांबले आहे. मात्र जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्र बिंदू हे विखे कुटुंबीयच दिसत आहेत. कारण काल रात्री डॉ. सुजय विखे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर आज महाजन तातडीने नागर दौऱ्यावर आले आहेत.

दुपारी तीनपासून शासकीय विश्रामगृहात भाजपचे पदाधिकारी आणि आमदारांसोबत बैठक सुरु आह्रे. या बैठकीत प्रामुख्याने सुजय विखे यांच्या उमेदवारीवर चर्चा सुरु असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

अहमदनगर लोकसभेसाठी डॉ. सुजय विखे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. नगर लोकसभेच्या मुद्द्यावरून आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु असताना आता स्वतः डॉ. सुजय विखे भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीला गेले होते.

काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालूक्यात निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी आले असता महाजन यांनी विखे पाटलांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती.”आम्हाला कुणाचीही एलर्जी नाही. विखे पाटलांनी तिकिटाची मागणी केली, तर वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय घेतला जाईल. आता कमळ हातात घ्यायचा का ? हा विखे पाटलांचा व्यक्तीगत प्रश्न आहे.”असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान,डॉ. सुजय विखे यांचा भाजपच्या कोणत्याही नेत्याशी संपर्क झालेला नाही. माझी व त्यांची भेटही झालेली नाही. विखे पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या केवळ दबावतंत्र असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले होते. मात्र शुक्रवारी विखे यांनी घेतलेल्या भेटीनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधान आले आहे.

Leave a comment

0.0/5