Skip to content Skip to footer

Loksabha 2019 – गोव्यात राजकीय नेत्यांची पोस्टर्स हटवण्यास सुरुवात

लोकसभेच्या गोव्यातील दोन मतदारसंघासाठी आणि विधानसभेची पोटनिवडणूक असलेल्या तीन मतदारसंघासाठी एकाचवेळी 23 एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच 10 मार्चपासून गोव्यातही आचारसंहिता लागू झाली आहे.त्यानंतर काल सायंकाळ पासून राजकीय पक्षांची पोस्टर्स आणि होर्डिंग्ज हटवण्यास सुरुवात झाली आहे. गोव्यातील उत्तर व दक्षिण गोवा या लोकसभेच्या दोन मतदारसंघाबरोबरच पोटनिवडणूक असलेल्या मांद्रे, शिरोडा व म्हापसा या तीन विधानसभा मतदारसंघातही निवडणूक होणार आहे. एकाचवेळी या पाचही जागासाठी मतदान होणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूकीसाठी समान कार्यक्रम 
लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूक कार्यक्रमही समान असणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 23 मार्च रोजी जाहीर होईल. 28 मार्च पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. 5 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल व 8 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असेल. 23 एप्रिल रोजी लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. 23 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

तब्बल 75 दिवस आचारसंहिता
गोव्यात 10 मार्च ते 23 मे अशी तब्बल 75 दिवस आचारसंहिता असणार आहे.

राज्यात 11 लाख 31618 मतदार
उत्तर गोव्यात एकूण मतदारांची संख्या 5,54072 एवढी आहे तर दक्षिण गोव्यात 577546 एवढी मतदारांची संख्या आहे. त्यामुळे राज्यात एकूण मतदारसंख्या 11 लाख 31618 एवढी आहे.

4 हजार 886 मतदारांची भर
मतदारयादी फेररचना कार्यक्रमामुळे 4886 मतदारांची यादीत भर पडली आहे. जानेवारी 2019 मध्ये मतदारयादी फेरआढावा घेण्यात आला होता. अगोदर मतदारसंख्या 11 लाख 26732 एवढी होती. अजूनही ज्या मतदारांना मतदार यादीत आपल्या नावाचा समावेश करायचा असेल त्याचा 4 एप्रिलपर्यंत समावेश केला जाणार आहे. मात्र त्यासाठी दहा दिवस अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे. 25 मार्चपर्यंत येणाऱ्या अर्जावर निवडणूक आयोग विचार करणार आहे.

पोटनिवडणूक होत असलेल्या म्हापसा मतदारसंघात मतदारांची संख्या 29103 एवढी आहे. मांद्रे मतदारसंघात मतदारांची संख्या 32129 एवढी तर शिरोडा मतदारसंघात मतदारांची संख्या 28919 एवढी आहे. गोव्यात सर्वाधिक मतदार वास्को मतदारसंघात असून तेथे 34640 एवढी आहे तर सांतआंद्रे मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 20929 एवढे मतदार आहेत. देशाच्या विविध भागात किंवा विदेशात मिळून 276 मतदार आहेत. शारीरिकदृष्टय़ा विकलांग असलेल्या मतदारांची संख्या 5046 एवढी आहे. एकूण 1652 मतदानकेंद्रे असून या सर्व मतदान केंद्रावर व्हील चेअरची सुविधा उपलब्ध असणार आहे.

आचारसंहिता भंगाची ऍपद्वारेही दखल
निवडणूक आचारसंहिता भंग करणाऱ्या विरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या ऍपची सुविधा उपलब्ध आहे. आचारसंहिता भंग करणाऱ्याचा मोबाईलद्वारे फोटो काढून किंवा व्हिडिओ करून ऍपवर पाठवल्यास कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर टोलफ्री नंबर सुविधाही उपलब्ध असणार आहे. सुविधा ऍप नावानेच ऍप तयार केले असून राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या सुविधेसाठी हे ऍप वापरता येणार आहे.

दारू, पैसे व वस्तूवर नजर
निवडणुकीत पैशांचा वापर किंवा भेटवस्तू देण्याचा प्रयत्न झाल्यास किंवा दारूचा वापर केला गेला तर त्यावर कारवाई होणार आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकाचवेळी गठ्ठा, वस्तू विकत घेतल्या किंवा बँकामधून व्यवहार झाले तर त्यावर नजर ठेवली जाणार आहे. उमेदवार कोणत्या वस्तू खेरेदी करतो यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. राज्यातील कॅसिनोवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. फिरती पथके जनतेच्या मदतीने नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमीची करावी लागणार जाहिरात
ज्या उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असेल किंवा पोलिसांत तक्रारी दाखल केलेल्या असतील तर अशा उमेदवारांनी आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत वृत्तपत्रात जाहिरात देणे बंधनकारक आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तसेच नंतर दोन दिवस मिळून एकूण तीन दिवस जाहिरात द्यावी लागेल तसेच किमान तीन वृत्तपत्रात ही जाहिरात प्रसिद्ध करावी लागणार आहे.

Leave a comment

0.0/5