पाकिस्तानने कितीही लपवले तरी हिंदुस्थानने पाकिस्तानचे एफ-16 हे लढाऊ विमान विंग कमांडर अभिनंदन यांनी पाडले आहे. त्या विमानाचा वैमानिक कोण होता याचीही माहिती आमच्याकडे आहे, असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांती बुधवारी सांगितले. हिंदुस्थानने पाकिस्तानने एफ-16 विमान पाडल्याचा दावा अनेकदा केला आहे, मात्र पाकिस्तानने तो मान्य केलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री सीतारमन यांनी हे विधान केले आहे.
कारगील युद्धावेळी पाकिस्तानाने ज्याप्रमाणे त्यांच्या सैनिकांचे बलिदान मान्य केले नाही त्याचप्रमाणे पाकिस्तानचे एफ-16 लढाऊ विमान हिंदुस्थानाने पाडल्याचे आणि वैमानिक गमावल्याचे पाकिस्तान मान्य करणार नाही. हिंदुस्थानी हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 विमानांचा पाठलाग हिंदुस्थानी लढाऊ विमानांनी केला. त्यात विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-16 पाडले. पाकव्याप्त कश्मीरमध्ये पडलेल्या या विमानातील वैमानिकाला गावकऱ्यानी हिंदुस्थानी वैमानिक समजून मारहाण केली. त्यात त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
अभिनंदनचा ‘हाय जोश’
पाकिस्तानच्या लष्कराच्या ताब्यात असताना विंग कमांडर अभिनंदन यांचा मानसिक छळ करण्यात आला, पण एवढे करूनही ते शांत राहिले. त्यांचा जोश हाय आहे, असे सीतारमन यांनी सांगितले. आम्हाला अशा परिस्थितीत शांत राहण्याचे प्रशिक्षण दिले जाते असे अभिनंदन म्हणाले, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.