सामना ऑनलाईन, कूरनूल
आंध्र प्रदेशात प्रतिस्पर्ध्याच्या बालेकिल्ल्यात जाऊन आपल्या पक्षाचा झेंडा लावण्याच्या प्रयत्नात झालेल्या राड्यात एक नेता आणि पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. या दोघांना गोळ्या लागल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. मंत्रालयम भागामध्ये तेलगू देसम पक्षाचे नेते पी.ठिक्का रेड्डी यांनी जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाचे प्राबल्य असलेल्या भागात जाऊन झेंडा लावण्याचा प्रयत्न केला होता.
ठिक्का रेड्डी हे आमदारकीची निवडणूक लढवत आहेत. कूरनूलमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली असून हा मतदारसंघ ( YSRCP ) या जगन मोहन रेड्डी यांच्या वाय.एस.आर काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. इथे आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी ठिक्का रेड्डींनी खग्गल गावात जाऊन तेलगू देसम पक्षाचा झेंडा रोवण्याचा निर्णय घेतला. ठिक्का रेड्डी या गावात आल्यानंतर त्यांच्यावर इथले विद्यमान आमदार बालांगी रेड्डींची बायको आणि त्यांच्या समर्थकांनी ठिक्का रेड्डींवर हल्ला केला. पोलिसांच्या देखत हा सगळा प्रकार सुरू झाला.
पोलिसांनी हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. ठिक्का रेड्डींच्या पोलीस संरक्षकाने हवेत गोळीबार करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव इतका हिंसक होता की हवेत गोळीबाराचा काहीही उपयोग झाला नाही. या झटापटीदरम्यान झालेल्या गोळीबारात ठिक्का रेड्डी आणि पोलीस उपनिरीक्षक वेणूगोपाल यांच्या पायाला गोळी लागली आहे. या गावामधे सधअया तणावपूर्ण शांतता आहे.