Skip to content Skip to footer

दादांचा पोरगा लय भारी, करी तोडफोड अन् मारामारी!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रागाचा पारा तर आपल्याला माहितच आहे, पण आता त्याचा मुलगा पार्थ याचाही राग सर्वांसमोर आलाय. एका नाईट क्लबमध्ये झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलानं आणि त्याच्या मित्रांनी आपल्या मित्राच्या गाडीची तोडफोड केलीय आणि मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैदही झालाय.

पार्थ आणि त्याच्या मित्रांनी नईफ मेमन याच्या ‘डस्टर’ या महागड्या गाडीची तोडफोड केलीच पण नईफला मारण्याचीही धमकी दिली, असा आरोप नईफचे वडील नदीम मेमन यांनी केलाय. फोर्ट परिसरात ही तोडफोड करण्यात आलीय. नईफ याचे पार्थ आणि त्याच्या मित्रांसोबत एका नाईट क्लबमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री नईफ फोर्ट येथील अफजो हाऊस येथील आपल्या घरी परतला. पहाटे सवाचारच्या सुमरास पार्थ आणि त्याचे मित्र नईफच्या बिल्डिंगखाली आले आणि त्यांनी खाली पार्क केलेल्या डस्टर कारला लक्ष्य केले. नईफ आणि त्याच्या वडिलांनी हा प्रकार वरून पाहिल्यानंतर ते दोघेही खाली आले, पण तोपर्यंत त्यांनी पळ काढला. ‘आज कार फोडली, नंतर तुझे डोके फोडू’ असा मॅसेज ओम या मित्राने नईफच्या मोबाईलवर केला. त्यामुळे नदीम यांनी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली.

 

पण, पार्थ पवार हा अजित पवार यांचा मुलगा असल्यानं पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचं नदीम मेमन यांनी म्हटलंय. मुख्य म्हणजे पार्थ आणि त्याच्या मित्रांनी घातलेला धिंगाणा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या सीसीटीव्ही फुटेजवरून पार्थ याच्या सांगण्यावरूनच त्याचे मित्र गाडी फोडत असल्याचं स्पष्ट दिसतंय.
याविषयी अजित पवार यांना विचारलं असता, ‘मला काहीही माहीत नाही. पण कोणीही चूक केली असेल तर त्याला फासावर लटकवा’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

Leave a comment

0.0/5