Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट

नगर मतदार संघातील वजनदार नेते तसेच काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देऊन आज अधिकृतपणे काँग्रेस पक्षाला राम-राम ठोकलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुजय विखे यांच्या तिकिटावरून रंगलेला वाद त्यानंतर शरद पवारांनी विखे कुटुंबा सोबत झालेले जुने वाद निवडणुकीच्या तोंडावर बाहेर काढल्यामुळे पवार आणि विखे-पाटील यांच्यातील संघर्ष महाराष्ट्रात पुन्हा पेटलेला दिसून येत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूरमध्ये सभा घेणार आहेत. त्यासाठी ते थोड्याच वेळात श्रीरामपूरमध्ये दाखल होणार आहेत.

या सभेपुर्वी ते राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार आहेत. तसेच काँग्रेसचे करण ससाणे यांच्या घरी ही भेट होणार असल्याचे समजते. त्यांच्यासमवेत जलसंपदामंत्री गिरीष महाजन हेही असणार आहेत. कालच राधाकृष्ण विखे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा स्विकारला असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. तर करण ससाणे यांचाही काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व राजकिय पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Leave a comment

0.0/5