Skip to content Skip to footer

शिवसेनेच्या दणक्याने ऍक्सिस बँकेतील ७१२ कर्मचाऱ्यांची नोकरी वाचली…..

शिवसेनेच्या दणक्यामुळे ऍक्सिस बँकेतील शेकडो कर्मचाऱ्यांची रोजीरोटी वाचली आहे. ७१२ डेटा एण्ट्री ऑपरेटर्सना बँक व्यवस्थापनाने तडकाफडकी निलंबित केले होते. तसा ई-मेलही व्यवस्थापनाने पाठवला होता. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेने त्याविरोधात आवाज उठवला. त्यामुळे बँक व्यवस्थापनाला तो ई-मेल मागे घेणे भाग पडले. ऍक्सिस बँकेतील डेटा एण्ट्री ऑपरेटर्सना कामावरून काढण्याचा ई-मेल बँकेच्या विविध खात्यांमध्ये पोहोचला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. शिवसेना उपनेते व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांना याची माहिती मिळताच त्यांनी बँक व्यवस्थापनाला याचा जाब विचारला. बँकेचे व्यवस्थापन आणि भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये दादर येथे यासंदर्भात बैठक झाली.

कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यासंदर्भातील ई-मेल त्वरित मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी महाडिक यांनी बँक व्यवस्थापनाला दिला. बरोबरच ठेकेदारी पद्धतीवरील सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा विषयही कामगार सेनेने या बैठकीत मांडला. त्यावर चर्चा झाल्यानंतर बँक व्यवस्थापनाने कामगार सेनेच्या मागण्या मान्य केल्या. या बैठकीला भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष अजित साळवी, सहचिटणीस तातू नाईक, कार्यकारिणी सदस्य संतोष खोत, ऍक्सिस बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल रुपारेल, उपाध्यक्ष अद्वैत दिवेकर, नागेश पाटील, माहीम भंडारी, सेव्हन एस बँकिंगचे संचालक सतीश पुसेगावकर आदी उपस्थित होते

Leave a comment

0.0/5