जिल्ह्यातील जंगलात जलस्त्रोत नसतानाच प्रकल्पांतही आता केवळ गाळ उरला असून, पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यजिवांचा या गाळात फसून जीव जात असल्याच्या विदारक घटना जिल्ह्यात घडत आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा परिसरात अवघ्या महिनाभरात तीन निलगार्इंचा गाळात फसून मृत्यू झाला; परंतु वनविभागाला पंचनाम्याखेरीज काही करता आले नाही.
वाशिम जिल्ह्यात प्रादेशिक जंगलाचे क्षेत्र लक्षणीय असून, काटेपूर्णा आणि सोहळ काळविट अभयारण्येही जिल्ह्यात आहेत. प्रादेशिक जंगलासह अभयारण्याच्या क्षेत्रात बिबट, अस्वल, तरस, कोल्हा, रानडुक्कर या हिंस्त्र वन्यप्राण्यांसह निलगाय, हरीण, काळविट, माकड, ससा, आदिसारख्या शाकाहारी वन्यजीवांची संख्या लाखाहून अधिक आहे. तथापि, जैवविविधेत अनन्य साधारण महत्त्व असलेल्या या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी तर सोडाच; परंतु संरक्षणासाठीही वनविभागाकडून आवश्यक प्रमाणात कुठल्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. तकलादू उपायांवर भर देण्यात धन्यता मानली जात आहे.
वन्यजिवांसाठी सर्वात आवश्यक अशा पाणवठ्यांच्या निर्मितीबाबत कमालीची उदासीनता दिसत आहे. नैसर्गिक जलस्त्रोत आधीच कमी असताना वनविभागाने तयार केलेल्या कृत्रिम पाणवठ्यांत पाणी टाकण्यात येत नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील वन्यजिवांचा अधिवास धोक्यात असताना त्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. जंगलात पाणी नसल्याने वन्यजीव शेतशिवार किंवा प्रकल्पांकडे पाण्यासाठी धाव घेत असून, यामुळे त्यांचा जीव संकटात सापडत आहेत. शेतशिवारात कधी विहिरीत पडून, तर कधी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात, तर कधी रस्ता अपघातात जखमी झाल्याने कित्येक वन्यजीवांचे बळी गेले आहेत.