Skip to content Skip to footer

किशोर कुमार यांच्या पहिल्या पत्नी अभिनेत्री रूमा गुहा ठाकुरता यांचे निधन

किशोर कुमार  यांच्या पहिल्या पत्नी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रूमा गुहा ठाकुरता उर्फ रूमा घोष यांचे सोमवारी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. कोलकात्यातील आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अलीकडे रूमा त्यांचा मुलगा अमित कुमार यांना भेटण्यासाठी मुंबईला आल्या होत्या. तीन महिने त्या अमित कुमार यांच्याकडेच होत्या. काही दिवसांपूर्वीच त्या कोलकात्याला परतल्या होत्या.

१९३४ मध्ये कोलकात्यात जन्मलेल्या रूमा यांनी १९५१ साली किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. पण हे नाते फार काळ टिकले नाही. केवळ सहा वर्षांत दोघांनीही घटस्फोट घेतला. या दांम्पत्याला एक मुलगा झाला. अमित कुमार त्याचे नाव. अमित कुमार सुद्धा एक गायक आहेत.

असे म्हणतात की, लग्नानंतर आणि मुलाच्या जन्मानंतर रूमा यांनी घर सांभाळावे, अशी किशोर कुमार यांची इच्छा होती. पण त्याकाळात रूमा या एक यशस्वी अभिनेत्री होत्या. त्यांची प्राथमिकता त्यांच्या करिअरला होती. याचमुळे दोघांमधील मतभेद वाढले आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. किशोर कुमार यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर  १९६० मध्ये रूमा यांनी अरूप गुहा ठाकुरता यांच्याशी लग्न केले. रूमा यांनी अनेक बंगाली चित्रपटात काम केले. याशिवाय संगीत क्षेत्रातही योगदान दिले. गंगा ओभीजान, पालातक, आश्तिे आसिओ ना, बालिका बधु असे अनेक शानदार चित्रपट त्यांनी दिले. त्यांचा बालिका बधु हा बंगाली चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.

रूमा या किशोर कुमार यांच्या पहिल्या पत्नी. यानंतर किशोर कुमार यांनी  एकूण चार लग्न केली. रूमा यांच्यानंतर किशोर कुमार यांच्या आयुष्यात मधुबाला आली. तिच्याशी त्यांनी दुसरे लग्न केले. मधुबालाच्या निधनानंतर त्यांनी योगिता बाली यांच्याशी तिसरे आणि त्यानंतर अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्याशी चौथे लग्न केले. लीना चंदावरकर यांच्याशी त्यांचे नाते अखेरपर्यंत टिकले.

Leave a comment

0.0/5