Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरे यांनी घेतला मुंबईतील परिस्थितीचा आढावा

आदित्य ठाकरे यांनी घेतला मुंबईतील परिस्थितीचा आढावा

मुंबईत गेल्या चार दिवसात महिन्याभरात पडणारा पाऊस पडल्याने काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वेसेवा आणि रस्ते वाहतूकच नव्हे तर विमानसेवेवर सुद्धा या अतिवृष्टीचा परिणाम झाला आहे. मुंबईत जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईच्या याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षात पोहोचले. मुंबईतील आपत्कालीन यंत्रणांच्या कामाचा त्यांनी आढावा घेत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

पाहणीनंतर बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना गरज नसेल तर बाहेर पडू नका तसेच पॅनिक होऊ नका, एकमेकांची मदत करा असं आवाहन केलं. तसेच साचलेलं पाणी वाहून जावं यासाठी कोणीही मॅनहोल उघडू नये असंही त्यांनी म्हटलं आहे. मुंबई महानगपालिकेची आपत्कालीन व्यवस्था ही इंटरनॅशनल स्टॅंडर्ड नुसार आहे. नाल्यांची क्षमता ही ५० मिमी एवढीच असते. तीस दिवसात पडणारा पाऊस केवळ तीन-चार दिवसात पडला असल्याने ही आपत्कालीन परिस्थिती आहे असं ते म्हणाले. मुंबईत पाणी उपसण्यासाठी महापालिकेने आणखी तीन पंपिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतला असून ती पुढील वर्षी पूर्ण होतील. सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा मुंबईकर म्हणून एकमेकांची मदत करा असं आवाहन त्यांनी केलं.

मुंबई महापालिकेचे कर्मचारी, सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी हे मुंबईची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. पावसाचा फटका प्रत्येकालाच बसला आहे. महापालिका हतबल आहे असं मी म्हणणार नाही, कारण जगातली कोणतीही महापालिका अशा आपत्कालीन परिस्थितीत काहीही वेगळं करू शकत नाही असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांची पाठराखण केली.

पावसाळ्यात मुंबई तुंबण्याची खरी कारणे नक्की वाचा

1 Comment

  • Durwas lanjewar
    Posted July 2, 2019 at 12:50 pm

    Jay shivaji

Leave a comment

0.0/5