Skip to content Skip to footer

शिवसेनेवर टीका करण्यापेक्षा राजू शेट्टी यांनी आत्मपरीक्षण करावं

 

एकेकाळी महायुतीत असलेल्या घटकपक्षाचे नेते राजू शेट्टी यांचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांनी दारुण पराभव केला. २०१४ लोकसभा निवडणुकीआधी महायुतीत सामील झालेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नंतर महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या आणि स्वाभिमानीचे द्वितीय क्रमांकाचे नेते असलेल्या सदाभाऊ खोत यांनी मात्र शेट्टींची साथ सोडली आणि ते भाजप सरकारमध्ये मंत्री म्हणून कायम राहिले.

शिवसेना-भाजपची युती अनिश्चित असताना राजू शेट्टी यांनी भाजपवर घणाघाती टीका करत आपल्याला युती करायची असल्यास शिवसेना पहिला पर्याय आहे असं म्हटलं होतं. पुढे शिवसेना भाजपची युती झाली आणि शेट्टी चक्क काँग्रेस आघाडीसोबत गेले. पुढे त्यांनी ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. लोकसभेत शिवसेनेने त्यांचा पराभव केल्यानंतर शेट्टी या ना त्या कारणाने शिवसेनेवर टीका करून आपलं समाधान करून घेताना दिसतात. प्रत्यक्षात त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

राजू शेट्टींचं राजकारण हे कारखानदारांना विरोधावर अवलंबून होतं. ऊस दर आंदोलनानेच त्यांना खासदारकी मिळवून दिली. पुढे महायुतीत गेल्याने ती कायम राहिली. २०१४ मध्ये जेंव्हा शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये येणार अशा बातम्या आल्या तेंव्हा शेट्टी यांनी पवार महायुतीत आल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीत राहणार नाही. ज्या पवारांशी लढण्यात आमची हयात गेली, त्यांच्यासोबत जाणार नाही असं राजू शेट्टी ठामपणे सांगायचे. अगदी महायुतीच्या व्यासपीठावरून त्यांनी ही भूमिका जाहीररीत्या मांडली होती. २०१४ लोकसभेच्या प्रचारात पवारांनी राजू शेट्टींच्या जातीचा उल्लेख केला.

हाच मुद्दा घेऊन पवारांना जातीयवादी म्हणत आणि कारखानदारीवर टीका करत राजू शेट्टी महायुतीचे खासदार झाले. पुढे भाजपसोबत मतभेद होताच ते महायुतीतून बाहेर पडले. शेतकरी मुद्द्यावरून आंदोलनं करणारे शेट्टी महायुतीतून बाहेर पडले तरी लोकांच्या मनातून उतरले नव्हते. शेतकरी प्रश्नावरून सत्तेत राहून भाजपला जाब विचारणाऱ्या शिवसेनेसोबत त्यांचे चांगले संबंध होते. शिवसेना स्वबळावर लढल्यास शेट्टी शिवसेनेशी युती करतील असं दिसत होतं, मात्र शेट्टी आघाडीसोबत गेले.

आघाडीसोबत गेलेल्या शेट्टींना शिवसेनेच्या धैर्यशील माने या तरुण तडफदार उमेदवाराचं आव्हान मिळालं. धैर्यशील माने युवा उमेदवार असले तरी जनसंपर्क, उत्तम वक्तृत्व, विकासाचे मुद्दे, विरोधकांवर टीकेपेक्षा स्वतःची चांगली बाजू मांडणं अशा गोष्टींनी त्यांची बाजू भक्कम केली. दुसरीकडे कारखानदारीला विरोध करणारे शेट्टी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. एरवी शेतकरी हीच माझी जात म्हणून मिरवणाऱ्या शेट्टींनी ब्राह्मण समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं. तिथेच शेट्टींच्या पराभवाचा पाया रचला गेला. शेतकरी आंदोलन मुद्दा निवडणुकीत प्रभावी ठरला नाही कारण शेतकऱ्यांना पिळणाऱ्या लोकांसोबत शेट्टी गेले होते.

शिवसेनेने सत्तेत राहून नेहमीच शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला. शेतकरी कर्जमाफी, पीक विमा या प्रश्नांवर आंदोलनं केली. शिवसेनेने गेल्या ५ वर्षात स्वखर्चातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. शिवाय धान्य, चारा, पाण्याच्या टाक्या इत्यादींचे वाटप केले आहे. हजारो दुष्काळग्रस्त जोडप्यांचा शिवसेनेने थाटामाटात विवाह लावून दिला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात शिवसेनेच्या शिवजलक्रांती या स्वखर्चातून केलेल्या योजनेमुळे अनेक वर्षांनी पाणी आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या फोटो प्रदर्शन आणि विक्रीतून उभारलेला ५ कोटींपेक्षा जास्त निधी दुष्काळग्रस्तांना दिला. दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेनेच्या नेत्यांनी जेवढे दौरे आणि मदतकार्य केलं तेवढं कोणीही केलेलं नाही. राजू शेट्टींनी शेतकऱ्यांचा फक्त वापर केला व खासदारकी वाचवण्यासाठी ते पवारांच्या कळपात शिरले.त्यांना थोडा जरी शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर त्यांनी खालील मुद्द्यांवर आत्मपरीक्षण करावं:

१) टोकाचा पवार विरोध करून राजू शेट्टी त्यांच्यासोबत का गेले?

२) पवारांनी माझी जात काढली, राष्ट्रवादी जातीयवादी आहे म्हणत पुन्हा त्यांच्या गळ्यात गळा घालणं हा शेट्टींचा स्वाभिमान आहे का?

३) शेट्टींची जात काढली म्हणून पवार जातीयवादी झाले, मग ब्राह्मण समाजाबद्दल अवमानकारक जातीयवादी वक्तव्य करणारे शेट्टी पवारांपेक्षा वेगळे कसे?

४) ज्या कारखानदारांना आयुष्यभर विरोध करून आमदार, खासदार झाले त्यांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणं कोणत्या शेतकरीप्रेमापोटी केलं?

५) काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन शेतकऱ्यांना कोणता न्याय मिळाला?

६) भ्रष्टाचारी म्हणून आघाडीवर टीका केलेली असताना त्यांच्यासोबत हातमिळवणी केल्याने राज्यातील दुष्काळ संपून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला का?

७) ज्या शेतकऱ्यांना हिंसक आंदोलनं करायला लावून दोनदा खासदार झाले त्या शेतकऱ्यांसाठी काय केलं?

८) ज्या शिवसेनेने शेतकऱ्यांना स्वखर्चातून मोलाची मदत केली त्यांच्यावर टीका फक्त खासदारकी गेली म्हणून करणार का? शिवसेनेने शेतकऱ्यांना जे काही दिलं त्याच शेट्टींना दुःख का आहे?

९) शेट्टींच्या स्वाभिमानीने किती दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत केली किंवा त्यांचे विवाह लावले?

१०) ज्या स्वामिनाथन आयोगावरून त्यांनी महायुती सोडली तो स्वामिनाथन आयोग काँग्रेस आघाडी सरकारने ६० वर्षे सत्तेत राहून लागू केला नाही तरीही शेट्टींना काँग्रेसकडून अजून आशा आहे का?

वरील सर्व बाबी फक्त खासदारकी टिकवण्यासाठी केल्या व ती गेल्यावर नाहक शिवसेनेवर टीका सुरु केली हे न समजायला शेतकरी वेडा नाही. त्यामुळे राजू शेट्टींनी टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करून त्यानुसार कार्य करावं. कदाचित गेलेली पत परत मिळेल, अन्यथा विधानसभेतही स्वाभिमानीचा दारुण पराभव निश्चित आहे.

शिवसेनेला मोठं यश: मोर्चा आधीच सरकार देणार पीक विमा

Leave a comment

0.0/5