Skip to content Skip to footer

विरोधकांनो, एकदा आम्हाला आजमावून पहा, तुम्ही आमच्यासोबत याल:आदित्य ठाकरे

शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद दौऱ्यातील तिसरी सभा आज चोपडा येथे पार पडली. भाषणाच्या सुरुवातीलाच एखादा विजय मिळाला असावा अशी ही सभा आहे. ठिकठिकाणी यात्रेचं स्वागत होत असल्याने मला पोहोचायला उशीर झाला त्याबद्दल मी आपली माफी मागतो. असं म्हणत आदित्य ठाकरेंनी जन आशीर्वाद यात्रेला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आभार मानले. खऱ्या अर्थाने आशीर्वाद घ्यायचे असतील तर जनतेचे आशीर्वाद घ्यावेत हे मला बाळासाहेबांनी शिकवलं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी जनतेला धन्यवाद दिले.

संपूर्ण महाराष्ट्र भगवा झालेला असून आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही महिन्यात, कोणत्याही मुहूर्तावर झाल्यातरी त्यानंतर महाराष्ट्रात फक्त भगवा आणि भगवाच रंग दिसेल असा आत्मविश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.शिवसेनेच्या विरोधात मतदान तेच करतात ज्यांना अजून शिवसेनेचं प्रेम मिळालं नाही, ज्यांना शिवसेना समजली नाही आणि ज्यांनी शिवसेनेचं काम पाहिलं नाही. त्यामुळे तुम्ही शिवसैनिक म्हणून आजपासून प्रत्येक गल्लीत, शहरात गावात गेलात आणि जनतेला हात जोडून विनंती केली की तुम्ही कोणत्याही पक्षाचे,धर्माचे,जातीचे असाल,मनात वाईट विचार आणू नका, तुम्हाला मदत लागली तर मनात शिवसेनेचा विचार आणा. एकदा आमचं प्रेम पहा, एकदा आम्हाला प्रेम देऊन पहा,एकदा आम्हाला आजमावून पहा, शिवसेनेचा सोबत तुम्ही हमखास याल हे मी छाती ठोकून सांगतो असा आत्मविश्वास व्यक्त करत आदित्य ठाकरे यांनी थेट विरोधकांना साद घातली.

ही प्रचारसभा नाही. तुम्ही गेल्या ५ वर्षात आणि मुख्य म्हणजे लोकसभेत शिवसेनेवर जे प्रेम दाखवलं त्याबद्दल आभार मानायला मी आलो आहे असा पुनरूच्चार आदित्य ठाकरे यांनी या सभेत बोलताना केला. शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी हा जनतेशी बांधील आहे. सत्तेत असो वा नसो आम्ही जनतेसोबतच राहणार आणि जनतेसाठीच लढत राहणार असा शब्द आदित्य ठाकरेंनी जनतेला दिला.

आदित्य ठाकरेंचा झंझावात, राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

Leave a comment

0.0/5