हाथरस प्रकरणात दोन मेडिकल रिपोर्ट एकात बलात्काराचा उल्लेख तर दुसऱ्यात…
हाथरस येथील पीडित मुलीवर झालेल्या बलात्काराच्या मुद्यावर आता अधिकारी वर्ग आणि पीडितेच्या कुटुंबियांची विधाने वेगवेगळी येत असतानाच आता समोर आलेल्या मेडिकल अहवालामुळे अधिकच गोंधळ वाढलेला आहे.
पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु असताना तरुणीने दिलेल्या जबाबावरून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर आठ दिवसांनी अलीगढच्या रुग्णालयाकडून पीडितेच्या मेडिको-लीगल निरीक्षणात खासगी अंगात ‘कम्प्लिट पेनिट्रेशन’, गळा दाबण्याचा आणि तोंड बांधण्याचा उल्लेख करण्यात आला होता.
परंतु जवाहरलाल नेहरू कॉलेजकडून देण्यात आलेल्या अंतिम निरीक्षणात ‘फॉरेन्सिक’चा हवाला देत पीडितेवर बलात्कार होण्याची शक्यता फेटाळून लावण्यात आली होती. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजने फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटकडून तयार करण्यात आलेल्या मेडिको लीगल केसमध्ये पीडिता हल्ल्याच्या वेळीच बेशुद्ध पडल्याचे सांगितले होते.
मात्र पीडितेच्या शरीरावर किंवा कपड्यांत किंवा कपड्यांवर वीर्याचे नमुने आढळले का? या प्रश्नाचं उत्तर लिहिताना ‘माहीत नाही’ असा उल्लेख केलाय. पीडितेवर हल्ला १४ सप्टेंबर रोजी झाला होता. निरीक्षण अहवाल २२ सप्टेंबर दुपारी १.३० वाजता पूर्ण झाला होता. निरीक्षण करणाऱ्या डॉक्टर भूमिका यांच्या म्हणण्यानुसार, पीडितेवर बळजबरी करण्यात आली होती. परंतु, याबद्दल फॉरेन्सिक सायन्स लॅबकडूनच निश्चित माहिती दिली जाऊ शकते, असही त्यांनी म्हटलं होते.