राज्यातील मंदिरे उघडण्यात यावे या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून डिवचण्याचा प्रयत्न केला होता. या पत्रात त्यांनी लिहिताना मुख्यमंत्र्यांना त्यांच्या हिंदुत्वादाची आठवण करून दिली होती. या पत्राला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी खमखमीत उत्तर दिले होते.
मला माझे हिंदुत्व सिद्ध करायला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे पत्रात लिहिले होते. यावरून आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार समूहाला दिलेल्या मुलाखतीतीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे. भाजपा शासित राज्यात भाजपाकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही ? बिगर भाजप शासित राज्यातच असे प्रयोग केले जात आहे. आपल्या सरकारचा मुख्यमंत्री नसला की त्या राज्यात संघर्ष करून अस्थिरता निर्माण करायची, असा घणाघात राऊत यांनी केला आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राजकीय भूमिकेत राहून राज्यपालांनी काम करु नये. पंतप्रधान, राज्यपाल ही सर्व धर्मनिरपेक्ष पदं आहेत. आपली घटनाही धर्मनिरपेक्ष आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याने सर्वांना अडचण होत आहे. कट कारस्थान करुन सरकार पडेल, असं कुणाला वाटत असेल, तर मूर्खपणाचं आहे. ज्यांना महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होईल असे वाटते, त्यांनी मूर्खांच्या नंदनवनात फिरु नये, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.