हिंदुत्व हृदयात, देश संविधानावर चालणार ; संजय राऊतांच्या विरोधकांना टोला
मंदिरे खुली करण्याच्या विषयावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. यावरून मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये लेटरवॉर पाहायला मिळाला होता.
यावर आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा भाष्य करत भाजपाला टोला लगावला आहे. यात, ‘हिंदुत्व हे शिवसेनेचा श्वास असून ते आमच्या हृदयात आहे. देश आणि राज्य संविधानानुसारच चालते’, असे उत्तर खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिले.
त्यानंतर राऊत म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी देशात हिंदुत्वाची मशाल तेवत ठेवली. त्यामुळे शिवसेनेला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही आणि कुणी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री ही पदे संविधानिक आहेत. धर्मनिरपेक्षता हे संविधानाचे तत्त्व असल्याने त्यानुसारच सगळ्यांनी कारभार केला पाहिजे. राज्य हे संविधानानुसारच चालले पाहिजे.