राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवावे, या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने सकारात्मक चर्चा पार पडली असल्याचे समजते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या माध्यमातून ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवावी अशी माहितीसुद्धा आता समोर आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाला किंवा मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध करणारे राज्यपाल म्हणून भगत सिंग कोश्यारी यांची एकूण प्रतिमा तयार झाली आहे.राज्यपाल स्वतः विरोधी पक्षनेत्यांची भूमिका बजावू लागल्याची चर्चा सुद्धा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने नियम व अटींचे निर्बंध घालून मुख्यमंत्र्यांनी टप्प्याटप्याने उद्योग व व्यवसायांना परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी स्वत: मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. तत्पूर्वी, कोरोनामुळे राज्यातील साडेआठ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अशक्य असल्याने त्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला होता. मात्र राज्यपालांनी सदर निर्णयाला विरोध दर्शवत राज्य सरकारविरोदात्त भूमिका मांडली होती.