Skip to content Skip to footer

कोरोनाची लस देताना व्हीआयपी आणि सर्वसामान्य असा भेदभाव करू नका! – अरविंद केजरीवाल

 

कोरोनाची लस देताना व्हीआयपी आणि सर्वसामान्य असा भेदभाव केलाजाऊ नये, असे मत आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मांडले आहे. केजरीवाल म्हणाले की, आज कोरोनाच्या संकटात सर्वांचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे कोरोनाची लस देताना व्हीआयपी आणि सर्वसामान्य असा भेदभाव केला जाऊ नये. तसेच कोरोनाची लस देताना कोविड योद्ध्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, असेही मत त्यांनी यावेळी मांडले.

केजरीवाल म्हणाले की, कोरोनावरील लसीचं वितरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून योजना तयार केली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकार मात्र राजकीय विचार न करता तांत्रिकदृष्ट्या आणि प्राथमिकतेच्या आधारावर कोरोनावरील लसीचं वितरण करण्यास प्राधान्य देईल.

हिवाळा सुरू होताच दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत असून, मुंबई मात्र सावरल्याचं दिसून येत आहे. दिल्लीतील नागरिकांचा निष्काळजीपणा आणि सरकारचा हलगर्जीपणा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचं एका सर्व्हेतून आढळून आलं आहे. सणांमध्ये वाढलेली नागरिकांची गर्दी, मेट्रो आणि बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा घाईने घेतलेला निर्णय, लॉकडाऊनमध्ये दिलेली सवलत, कोविड सेंटरची कमतरता आणि मोहिमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आलेलं अपयश या पाच कारणांमुळे दिल्लीतील कोरोना नियंत्रणाचा कार्यक्रम फसल्याचं या अहवालातून पुढे आलं आहे.

दिल्लीमध्ये २८ ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. २८ ऑक्टोबरला दिल्लीत ५ हजारांहून अधिक कोरोना रुग्णसंख्या आढळली. ११ नोव्हेंबरला ८ हजार कोरोना रुग्ण आढळले होते. कोरोना संसर्गाचे प्रमाण दिल्लीत वाढत असून, बुधवारी ७,४८६ कोरोना केसेस समोर आल्या आहेत. तर १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या ७९४३ वर पोहोचली आहे.

Leave a comment

0.0/5