तांडव या वेब सीरिजविरुद्ध देशभरात गुन्हे दाखल होण्याचे सत्रच सुरू झाल्याले दिसत आहे. सीरिजमधील एका दृश्यावर आक्षेप घेत भाजपाने आक्षेप घेतला होता. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत भाजपाच्या नेते व कार्यकर्त्यांनी देशभरात दिग्दर्शक व निर्मात्याविरुद्ध ठिकठिकाणी गुन्हेही दाखल केले. आता या वादाचा हवाला देत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपाला धारेवर धरले आहे. अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावर “भाजपाने ‘तांडव’ सोडा, पण भांगडाही केला नाही,” अशा शब्दात शिवसेनेनं समाचार घेतला आहे.
‘तांडव’मधील दृश्यावरून सुरू झालेल्या वादाचे देशभर पडसाद उमटले. गुन्हेही दाखल झाले. या प्रकरणावर भाजपाने आक्रमक भूमिका घेतलेली असून, शिवसेनेने भाजपचे अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधला आहे. “भारतीय जनता पक्ष म्हणजे सध्या हास्यविनोदाचा विषय झाला आहे. रोज नवी सोंगे-ढोंगे आणून जनतेचे मनोरंजन करण्याचा प्रयोग ते करीत असतात, पण त्यांचे टुकार प्रयोग जनतेच्या पसंतीस उतरत नाहीत. ‘तांडव’ नावाची एक वेब सीरिज सध्या प्रदर्शित झाली आहे.
सध्याच्या राजकारणाचे वास्तव दाखवणारी ही सीरिज असल्याचे सांगतात. दिल्लीचे राजकारण, विद्यापीठातील राजकीय चढाओढ असे काही विषय त्यात घेतले आहेत, पण या सीरिजमध्ये हिंदू देवदेवतांविषयी काही आक्षेपार्ह विधाने असल्याचा बोभाटा भारतीय जनता पक्षाने केला. भारतीय जनता पक्षाने जे ‘तांडव’ सुरू केले आहे, त्यात प्रामाणिकपणाचा लवलेश नक्की किती ही शंका आहेच. कारण जो ‘तांडव’विरोधात उभा ठाकला आहे तोच भाजप भारतमातेचा अवमान करणाऱ्या त्या अर्णब गोस्वामीसंबंधात तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प का बसला आहे? हिंदुस्थानी सैनिकांचा, त्यांच्या हौतात्म्यांचा घोर अपमान जितका गोस्वामीने केलाय तितका अपमान पाकड्यांनीही केला नसेल,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.