Skip to content Skip to footer

रॅली दरम्यान कोरोनाचे नियम न पाळल्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल

विनापरवाना ट्रॅक्टर रॅली काढणे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नोंदविला असून त्यांच्यासोबत स्वाभिमानीच्या इतर २५० कार्यकर्त्यांवरसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. स्वाभिमानीने सोमवारी (२५ जानेवारी) सांगली ते कोल्हापूर अशा ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी सांगली ते कोल्हापूर अशी ट्रॅक्टर र्रली आयोजित केली होती. यावेळी या रॅलीचे नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. त्यांच्यासोबत दोनशे ते अडीचशे ट्रॅक्टरसह स्वाभिमानीचे इतर कार्यकर्तेही रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

याच रॅलीमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न केल्याचा ठपका राजू शेट्टींसह इतर कार्यकर्त्यांवर ठेवण्यात आला आहे. तसेच, यावेळी कोणतीही परवानगी नसताना शेट्टी यांनी ट्रॅक्टर रॅली काढल्याचही पोलिसांनी म्हटलं आहे. शेट्टींविरोधात कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5