Skip to content Skip to footer

गोरगरीब जनतेची भुक भागवणारी “शिवभोजन थाळी” झाली एक वर्षाची

ग्रामीण भागात ज्या थाळीचा उल्लेख “अन्नपुर्णेची थाळी” म्‍हणून केला जातो त्या शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीला वर्ष पुर्ण झाले असून योजना सुरु झाल्यापासून आतापर्यत ३ कोटी ५ लाख ३९ हजार ६४४  नागरिकांनी शिवभोजन थाळीचा अस्वाद घेतला आहे.

हे शासन संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीत दिलेल्या शिकवणुकीनुसार काम करत आहे. या दशसुत्रीत “भुकेलेल्यांना अन्न” हे एक सुत्र आहे ते डोळ्यासमोर ठेऊन शिवभोजन योजनेची आखणी करण्यात आली असून शिवभोजन थाळीने लाखोच नाही तर कोट्यावधी लोकांची भुक भागवण्याचे काम केले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने व योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी  मुख्यमंत्र्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विभागाचे सचिव, अधिकारी- कर्मचारी, शिवभोजन योजनेचे केंद्र चालक यांचे अभिनंदन केले आहे, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दराने जेवण उपलब्ध करून देण्यासाठी गेल्यावर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता.  एक वर्षभरात शिवभोजन योजनेअंतर्गत ९०५ केंद्र सुरु झाले असून योजनेवर आतापर्यंत ८६.१० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

Leave a comment

0.0/5