Skip to content Skip to footer

बहुमत तुम्हाला लोकांना मारण्याची परवानगी देत नाही, ममता बॅनर्जी यांची मोदी सरकारवर टीका

प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे शेतकरी आंदोलक आणि दिल्ली पोलीस यांच्यात झालेल्या वादावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यात मोदी सरकारवर चोहे बाजूंनी टीका होताना दिसत आहे. त्यात आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी नव्या कृषी कायद्यावरून सरकारला खडेबोल सुनावले आहे. आपल्याकडे बहुमत आहे आणि कृषी कायदे संसदेत मंजुर करण्यात आले आहेत, असे केंद्र सरकारकडून सांगितल जात आहे. या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “बहुमत तुम्हाला लोकांच्या हत्या करण्याची परवानगी देतं नाही. इतकंच नाही तर राजीव गांधी यांच्याकडेही बहुमत होते. कृषी कायदे घाईत गडबडीत आणले गेले आहेत.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, करोना काळात आवाजी मतदानाने हे कायदे मंजूर करण्यात आले आहेत. इतरांपेक्षा मला संसदेबद्दल चांगली माहिती आहे. ते (मोदी सरकार) कृषी कायदे मागे का घेत नाहीये? त्यात काय धोका आहे? मी केंद्र सरकारला विनंती करते की कृषी कायदे रद्द करावेत, असं आवाहनही ममता यांनी केंद्राला केलं आहे.

Leave a comment

0.0/5