Skip to content Skip to footer

गरज सरो; पटेल मरो! आजच्या सामना अग्रलेखातुन नरेंद्र मोदींवर बोचरी टीका

(फोटो सौजन्य एएनआय)

अहमदाबादमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. या निर्णयावरून काँग्रेस बरोबर सर्व विरोधकांनी भारतीय जनता पक्षावर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यात आता आजच्या सामना अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यांवर बोचरी टीका केली आहे.

गुजरातलाच सरदार पटेलांविषयी आस्था नसेल तर इतरांनी विरोधाच्या टिपऱ्या का बडवायच्या? अशी थेट विचारणा आजच्या सामना अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. सरदार पटेलांचे महत्त्व नव्या राजकारणात संपले आहे. उद्या नेताजी बोसही संपतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापरही मागच्या निवडणुकीत झालाच होता. आता गरज सरो पटेल मरो हा त्याच नाटय़ाचा भाग आहे अशी टीका सामनातून करण्यात आलेली आहे.

जगातली प्रत्येक मोठी गोष्ट गुजरातलाच करायची या ध्यासाने दिल्लीतील मोदी-शहांचे सरकार पछाडलेले दिसत आहे. त्यात काही चुकले असे वाटण्याचं कारण नाही. आपल्या मातीवर प्रेम असणे हा गुन्हा नाही, पण आपण देशाचे नेतृत्व करीत आहोत हे भान विसरून कसे चालेल! असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

मोटेरा स्टेडियमला आधी भारतरत्न सरदार पटेल यांचे नाव होते. ते बदलून मोदी यांचे नाव दिले. गुजरातमध्ये आधी सरदार पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला. अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ म्हणजे स्वातंत्र्य देवतेच्या पुतळय़ापेक्षा सरदार पटेलांचा पुतळा उंच आहे व काँग्रेसने अपमानित केलेल्या सरदारांचा मानसन्मान, उंची वाढविणारा हा पुतळा असल्याचे श्री. मोदी यांच्याकडून सांगण्यात आले.

तसेच पटेल यांचे नामोनिशाण मिटविण्याचा प्रयत्न काँग्रेस किंवा नेहरू-गांधी घराण्याने केला असे गेल्या पाचेक वर्षांत अनेकदा सांगण्यात आले, पण गुजरातमधील सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून ते करावे असे काही सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी सुचविल्याचे दिसत नाही. पटेल यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न नक्की कोण करीत आहे, ते यानिमित्ताने दिसले असा टोला लागवण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5