महाराष्ट्र बुलेटिन : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात दाखल केलेल्या सीबीआय चौकशीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने बुधवारी सुनावणी नाकारली. या याचिकेत परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरूद्ध निष्पक्ष आणि स्वतंत्र सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने सांगितले की या प्रकरणात अनिल देशमुख यांना पक्षकार का बनविले गेले नाही? खंडपीठाने असेही विचारले आहे की तुम्ही प्रथम उच्च न्यायालयात का गेला नाहीत? सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की ही फार गंभीर बाब आहे.
सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंगच्या वकिलाला विचारले की कलम ३२ अंतर्गत याचिका का दाखल केली आहे, तुम्ही २२६ अंतर्गत का दाखल केली नाही? यानंतर न्यायालयाने परमबीर सिंग यांना हायकोर्टाचा दरवाजा ठोठावण्यास सांगितले. यानंतर परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयातील आपली याचिका मागे घेतली असून आपण मुंबई उच्च न्यायालयात जाणार असे सांगितले आहे.
परमबीर यांच्या वकिलांनी सांगितले की आम्ही आजच उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, आपण (सुप्रीम कोर्ट) उच्च न्यायालयाला निर्देश द्यावे की या प्रकरणाची सुनावणी उद्या करावी. यावर सर्वोच्च न्यायालयाने अशी कोणतीही सूचना हायकोर्टाला देण्यास नकार दिला.