Skip to content Skip to footer

उद्या दुसऱ्यांदा होणार ‘देशव्यापी संप’, जाणून घ्या त्याबाबत ‘सर्वकाही’

महाराष्ट्र बुलेटिन : देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या निषेधास सुमारे ४ महिने होत आले आहेत. अशा परिस्थितीत सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याचा निषेध तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन लोकांना केले आहे. गेल्या आठवड्यात संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) संपूर्ण भारत बंदची रणनीती आखण्यासाठी विविध जनसंघटना आणि संघटनांची बुधवारी भेट घेतली होती.

काय-काय असेल बंद

शेतकऱ्यांच्या दुसर्‍या भारत बंद दरम्यान सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत सर्व आस्थापना बंद राहतील. यावेळी रेल्वे व रस्ते वाहतुकीसही परवानगी दिली जाणार नाही, अशी घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे. गंगानगर किसान समितीचे रणजित राजू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शेतकरी चळवळीला २६ मार्च रोजी चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे, त्या निमित्ताने देशव्यापी बंद पुकारण्यात येत असून दुकाने व व्यापारी संस्था १२ तासांसाठी बंद राहतील.

ते म्हणाले, “बंद सकाळी सहा वाजता सुरू होईल व संध्याकाळी सहा पर्यंत चालेल आणि या दरम्यान सर्व दुकाने, डेअरी तसेच सर्व काही बंद राहील,” संघटनेच्या नेत्यांनी सांगितले आहे की, नवीन कृषी कायद्याचा विरोध म्हणून शेतकरी होलिका दहनात कायद्याच्या प्रती जाळतील. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी २६ मार्च रोजी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे.

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. ते तीनही कायदे मागे घेण्याबाबत आणि किमान आधारभूत किंमतीवर कायदेशीर हमीची मागणी करीत आहेत. नवीन कायदे लागू झाल्यानंतर एमएसपी संपुष्टात येईल आणि कृषी क्षेत्रावर बड्या कॉर्पोरेट चा कब्जा होईल अशी भीती शेतकऱ्यांना आहे. तथापि, हा मुद्दा संपवण्यासाठी शेतकरी आणि सरकार यांच्यात १० वेळा बैठका घेऊन चर्चा झाली आहे, परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही ठोस मुद्यावर सहमती झाली नाही.

ही दुसरी वेळ आहे जेव्हा शेतकऱ्यांनी देशव्यापी संप जाहीर केला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर रोजी ‘बंद’ पुकारला होता. त्याचा परिणाम दिल्ली, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आसाममध्ये दिसून आला. याशिवाय अनेक कामगार संघटना व संघटनांचेही सहकार्य शेतकऱ्यांना मिळाले. कॉंग्रेस आणि राकंपा यांच्यासह २५ विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आले होते.

Leave a comment

0.0/5