Skip to content Skip to footer

ऑलिम्पिकच्या दृष्टीने ‘रौप्यपदक’ माझ्यासाठी खूप मोलाचे- राही सरनोबत

महाराष्ट्र बुलेटिन : कोल्हापूरच्या राही सरनोबतने राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक- २०२१ स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यावेळी राहीने सांगितले की, ऑलिम्पिकच्या दृष्टीने माझ्यासाठी ही स्पर्धा अतिशय महत्वाची होती. या कारणामुळे हे रौप्यपदक माझ्यासाठी खूप मोलाचे आहे.

तसेच राहीने पुढे म्हटले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहेत. जवळपास एका वर्षानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरल्यामुळे कामगिरी कशी होईल, याबाबत साशंक होते. दरम्यान स्पर्धेत माझी सुरुवातही अपेक्षेप्रमाणे झालेली नव्हती. मात्र नंतर रौप्यपदकापर्यंत मजल गेल्याने खूप समाधानी आहे, असे तिने स्पष्ट केले.

महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या तीन नेमबाजांनी वर्चस्व प्रस्थापित केले. चिंकी यादवने सुवर्ण, राही सरनोबतने रौप्य तर मनू भाकरने कांस्यपदकाची कमाई केली. या अतुलनीय कामगिरीनंतर राहीने सांगितले की, “गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही अंदाजानुसार सराव करत होतो आणि कोरोनानंतरची ही माझी पहिली स्पर्धा होती. या आधी आम्ही ऑलिम्पिकसाठी सराव करताना अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत होतो. परंतु आताची परिस्थिती वेगळी आहे, यापुढे स्पर्धा होतील की नाही हाच प्रश्न खऱ्या अर्थाने सतावत आहे, त्यामुळे सरावाच्या दृष्टीने ही स्पर्धा खूप महत्वाची होती.”

Leave a comment

0.0/5