Skip to content Skip to footer

अजित पवारांना फोन केला तरी बेड मिळायचे नाहीत… तेव्हा काय करणार?

महाराष्ट्र बुलेटिन : आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी वाढत्या कोरोनाबाबत भाष्य केले. ते म्हणाले की लॉकडाऊनच्या विरोधात मी देखील आहे. परंतु सध्याची कोरोनाची वाढती संख्या बघता असे दिसत आहे की शंभर टक्के हॉस्पिटल जरी ताब्यात घेतले तरी कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळणे कठीण आहे. कोरोनापासून बचाव करण्याचे नियम लोकांनी मोडले आहेत. कितीही कडक निर्बंध लादले तरी लोक ते पाळत नाहीत. एखाद्याच्या घरात कोरोनाचा रुग्ण असला तरी ते गावभर फिरून येतात. त्यामुळे या निर्बंधांचा काहीही उपयोग होत नाही.

संख्या आवाक्याबाहेर गेल्यावर अजित पवारांना फोन केला तरी बेड मिळायचे नाहीत… तेव्हा काय करणार? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीदरम्यान उपस्थित केला. सर्व लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व पोलीस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनला विरोध केला परंतु कडक निर्बंध लागू करण्यात यावे अशी भूमिका घेतली.

या बैठकीमध्ये लसीकरण केंद्रे वाढवण्यात यावीत असा प्रस्ताव देण्यात आला. अजून ५० ऑक्सिजन आणि २२५ व्हेंटिलेटर बेड्सची आवश्यकता आहे. सध्या ८०० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्स १३ ऑक्टोबर २०२० ला प्रशासनाच्या ताब्यात होते. ६ एप्रिलपर्यंत तेवढेच बेड ताब्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. पुणे महानगरपालिकेकडून सार्वजनिक जागेवर थुंकल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे, असे जिल्ह्याधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Leave a comment

0.0/5