महाराष्ट्र बुलेटिन : पुण्यातील कोरोनास्थितीची बैठक पार पडल्यानंतर आज पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की पुण्यातील रेस्टॉरंट, बार, हॉटेल हे सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहतील, मात्र हॉटेलमधून पार्सल सेवा सुरु राहील. तसेच PMPML बस सेवा ७ दिवस बंद राहणार आहे. तसेच पुण्यामध्ये संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. याव्यतिरीक्त येणाऱ्या दोन दिवसात प्रतिदिवस कोरोनाबाधितांची संख्या ९ हजारांवर जाण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.
आयुक्त सौरभ राव यांनी पुढे सांगितले की, इतर सर्व सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभर बंदी राहणार असून या काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरु राहणार आहेत. अंत्यविधीसाठी फक्त २० जणांना परवानगी असणार आहे. तसेच याआधी ठरलेल्या लग्नसमारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असेल. मॉल आणि सिनेमा हॉल, धार्मिक स्थळे सात दिवसांसाठी बंद राहणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
दररोज कोरोनाबाधितांची संख्या ही वाढतच आहे, याबाबतीत त्यांनी चिंता व्यक्त केली. या अनुषंगानेच पायाभूत सुविधांवर भर देणे, आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात बळकट करणे, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, आयसीयू यांची संख्या वाढविणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच त्यांनी सांगितले की जर अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर काही रुग्णालयांना १०० टक्के कोविड रुग्णालय म्हणून घोषित करावे लागू शकते.