या’ आमदाराने लोकांना रेमडिसिव्हीर मिळावी म्हणून मोडली स्वतःची ९० लाखांची एफडी, जाणून घ्या…
महाराष्ट्र बुलेटिन : कोरोना साथीच्या भयंकर परिस्थितीमध्ये असे देखील काही लोकप्रतिनिधी आहेत, जे ताकद पणाला लावून कोरोनविरोधात लढत आहेत. नागरिकांना मदत करत आहेत. यापैकीच एक म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदार संघ तसा थोडासा दुर्लक्षितच, तेथील भौगोलिक परिस्थिती पाहता आर्थिक बाबतीत देखील थोडा मागेच आहे. येथे आदिवासी पाडे, तांडे, वाडे यांचीच संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे येथील ७० टक्के लोकसंख्या ही मजुरीसाठी स्थलांतर करत असते.
अशा परिस्थितीमुळे येथील जनतेला कोरोना काळात आधाराची नितांत आवश्यकता आहे. त्यांची ही गरज पूर्ण करण्यासाठी सक्षम असा आमदार संतोष बांगर यांच्या रुपाने येथील जनतेला मिळाला आहे.
आमदार बांगर हे हाडाचे शिवसैनिक आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक असा प्रवास करत ते पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे मोठ मोठ्या संस्था नाहीत. शेती हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे यंत्रणा कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आणि या परिस्थितीशी दोन हात कसे करायचे हा प्रश्न पडला तेव्हा संतोष बांगर यांनी स्वतःचा मोबाईल नंबर हेल्पलाईन नंबर म्हणून जाहीर केला.
लोकांनी कधीही फोन केला तर पहिल्या-दुसऱ्या रिंगला ते स्वतः फोन उचलतात आणि कुणाला बेड हवे असेल, कुणाला रेमडिसिव्हीर हवे असेल किंवा कुणाला ऑक्सिजन हवे असल्यास बांगर साहेब स्वतः प्रयत्न करून ते उपलब्ध करून देतात.
विशेष म्हणजे त्यांनी या प्राणघातक संकटात सुमारे १० हजार रेमडिसिव्हीर इंजेक्शन स्वखर्चाने पुरवली आहेत. यासाठी त्यांनी स्वतःसाठी बँकेत ठेवलेली मुदत ठेवही मोडली. तसे बघितले तर कळमनुरीमध्ये हाॅस्पिटलची संख्या फार कमी आहे. फारशा अद्ययावत सुविधा नाहीत, त्यामुळे स्वतः प्रयत्न करुन पाच खासगी कोविड सेंटर त्यांनी सुरू केली आहेत.
बांगर साहेबांना याची जाणीव आहे की लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे, त्यामुळे जनतेला आपल्याशिवाय दुसरे कुणीच वाली नाही. त्यामुळे एक लोकसेवक या नात्याने जनतेला मदत करणे ही त्यांची पहिली जबाबदारी आहे. जरी त्यांच्याकडे पैशांची कमतरता असेल मात्र प्रचंड इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे. ‘इच्छा तेथे मार्ग’ ही म्हण त्यांनी खरी केली आहे.