महाराष्ट्र बुलेटिन : संपूर्ण देशात व राज्यात कोरोनाच्या साथीने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलेल्या अवस्थेत आहे.
आरोग्य व्यवस्थेवरील वाढता ताण कमी करण्यासाठी माणुसकी या नात्याने सहकार्य केले तर मोठ्या प्रमाणात मदत मिळू शकते. या पार्श्वभूमीवर आता शिवसैनिक घरोघरी जाऊन कोरोनाविरोधात काम करत आहेत. मात्र आता केवळ शिवसैनिकच नव्हे तर सर्वांनी एकत्र येऊन या कामाला चालना देण्याची नितांत आवश्यकता आहे.
याकरिता सर्वपक्षीय व सामाजिक संस्थांनी, विविध गणेश मंडळ व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन कोरोनाच्या लसीबद्दल लोकांना माहिती दिली पाहिजे आणि त्यांना राज्य शासनाने दिलेल्या व पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे.
या समाजोपयोगी कामासाठी सर्व संघटनांनी पुढाकार घेण्याची वेळ खऱ्या अर्थाने आता येऊन ठेपली आहे, यामुळे निश्चितच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल यात कुठलीही शंका नाही. या कठीण काळात सर्वतोपरी मदत कार्य सुरू करावे तेव्हाच कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला आटोक्यात आणता येईल, व १ तारखेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी केले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की आत्ताचा काळ खूप कठीण आहे. व्हेंटिलेटर मिळत नाही, ऑक्सिजनचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे, त्यामुळे काळजी घेणे हाच एकमेव पर्याय आपल्याकडे आहे, त्यामुळे लसीकरण करून सर्वांनी शासनाला व समाजाला मदत करावी आणि कोरोनाचा नायनाट करावा असे आवाहन देखील कटके यांनी नागरिकांना केले.