महाराष्ट्र बुलेटिन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी १९ जुलैपासून देशात कोविड संदर्भातील अनेक निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला शिवसेनेने ‘आत्मघातकी’ असे संबोधले आहे. त्याचबरोबर पक्षाने असेही म्हटले आहे की या निर्णयाचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो. पंतप्रधान जॉन्सन यांनी नुकतेच सांगितले होते की ब्रिटनला व्हायरस बरोबर जगायला शिकावे लागेल. तथापि, याबाबत अंतिम निर्णय १२ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.
आपल्या मुखपत्र सामनामध्ये शिवसेनेने लिहिले की, ‘आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आजही ब्रिटनमध्ये ३२ हजाराहून अधिक सक्रिय रूग्ण आहेत. याशिवाय ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन डेल्टा व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. अशा परिस्थितीतही पंतप्रधान जॉनसन यांनी १९ जुलैपासून देशातील सर्व निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनचा हा निर्णय निर्भय असू शकतो पण तो आत्मघातकी असल्याचेही सिद्ध होऊ शकतो.’
पक्षाने या निर्णयास संपूर्ण जगासाठी धोकादायक म्हटले आहे. संपादकीयमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘चीनमधील एका शहरातून बाहेर पडलेला हा विषाणू पाहता पाहता साता समुद्रापार पोहोचला आहे. या विषाणूमुळे संपूर्ण जग अस्वस्थ झाले आहे. करोडो लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. ४० लाखाहून अधिक लोक मरण पावले आहेत. डोळ्यासमोर ही सर्व भीषण परिस्थिती असूनही कोरोना रोखण्यासाठी केलेले सर्व निर्बंध रद्द करून, जनतेला मुक्तपणे फिरण्यास परवानगी देणे हा निर्णय केवळ ब्रिटनलाच नव्हे तर संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरू शकतो.
या दरम्यान शिवसेनेने कोरोना विषाणूच्या लॅमडा व्हेरियंटबाबतही चिंता व्यक्त केली आहे. सामनामध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, ‘लॅमडा’ हा व्हेरियंट कोरोनाच्या मूळ विषाणू आणि डेल्टा व्हेरियंटपेक्षा देखील जास्त घातक आहे. त्याचे काही रुग्ण ब्रिटनमध्येही आढळले आहेत. असे असूनही मास्कसह सर्व निर्बंध हटविण्याचा ब्रिटनचा निर्णय आत्मघातकी असल्याचे सिद्ध होऊ शकतो.
दरम्यान सोमवारी जॉनसन यांनी याची पुष्टी केली होती की ब्रिटन मास्क आणि सामाजिक अंतराशी संबंधित नियम काढून टाकणार आहे. ते म्हणाले होते की जेव्हा देश लॉकडाऊन उठविण्याच्या अंतिम टप्प्यात असेल, तेव्हा कायदेशीर नियंत्रण ‘वैयक्तिक जबाबदारी’ सह बदलले जाईल. या नवीन बदलानुसार, लोक मास्क वापरणे थांबवू शकतात. तथापि, काही ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.