महाराष्ट्र बुलेटिन : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा सध्या पोलिस कोठडीत आहे. अश्लिल चित्रपट बनवण्यासाठी आणि काही अॅप्सच्या माध्यमातून ते प्रकाशित केल्याप्रकरणी राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. या प्रकरणात राज कुंद्रासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या हाती काही इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडले आहेत, ज्यावरून असे स्पष्ट होत आहे की राज ‘लाइव्ह सेक्शुअल अॅक्ट’ बाबतच्या प्रयत्नात होता. राज कुंद्राला पॉर्नचा व्यवसाय बॉलिवूड इतकाच मोठा करायचा होता.
टाइम्स ऑफ इंडियाने मुंबई पोलिसांच्या सूत्रांचा हवाला देत दावा केला आहे की मुंबई पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडले आहेत. या पुराव्यांनुसार पॉर्नचा व्यवसाय बॉलिवूडइतका मोठा व्हावा अशी राजची इच्छा होती. एवढेच नव्हे तर राज ‘लाइव्ह सेक्शुअल अॅक्ट’ ला या व्यवसायाचे भविष्य मानत होता. मुंबईचे सह पोलिस आयुक्त मिलिंद भ्रांबे म्हणाले की, राजच्या ‘हॉटशॉट’सह अशा पद्धतीच्या सर्व साईट्सना अॅपल आणि गुगल प्लेस्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहे.
राज कुंद्राचे म्हणणे आहे की त्याने २०१९ मध्येच त्याची ही कंपनी विकली आहे. राज कुंद्राच्या खटल्याबद्दल चर्चा केली तर प्रॉपर्टी सेलने राजच्या विरोधात न्यायालयात पुरावे सादर करताना सांगितले की, वियान (Vian) नावाच्या कंपनीत प्रॉपर्टी सेलला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळाले आहे. राज कुंद्राचा फोन हस्तगत करण्यात आला असून त्याच्या चौकशीची गरज आहे. त्या आधारे पोलिसांनी कोर्टाकडे राजचा रिमांड मागितला आणि कोर्टाने राज कुंद्राला २३ जुलै पर्यंत रिमांडवर पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज कुंद्रा याच्याविरोधात फेब्रुवारी २०२१ मध्ये पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याच्यावर अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपासणीत दोषी आढळल्यानंतर पोलिसांनी आज राज कुंद्राला अटक केली.
दोषी ठरल्यास होईल मोठी शिक्षा
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा दोषी आढळल्यास तुरूंगात बराच काळ घालवावा लागू शकतो. कारण पॉर्नोग्राफीबाबत आपल्या देशाचा कायदा अतिशय कठोर आहे. अश्लीलतेच्या प्रकरणात आरोपीविरुध्द आयपीसीच्या अनेक कलमांनुसार तसेच आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जातो. त्याचबरोबर देशात तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या वाढत्या जाळ्यामुळे आयटी कायद्यातही दुरुस्ती करण्यात आल्या आहेत.