Skip to content Skip to footer

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या

महाराष्ट्र बुलेटिन : सध्या राज्यात अती मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक नद्यांना महापूर आल्याने गावे उद्ध्वस्थ झाली आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत.

त्याच अनुषंगाने आज शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी शिरोळ तालुक्यात जाऊन शिरोळ व नृसिंहवाडी या गावांना भेटी देत पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या तोंडून सर्व समस्या ऐकून घेतल्या. राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही देत महापुरामुळे नुकसान झालेल्यांना शासन लवकरच नुकसानभरपाई देण्यासाठी धोरण जाहीर करेल असे आश्वासन देखील दिले.

या भेटीदरम्यान राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या व पूरपरिस्थितीबाबत सविस्तर माहिती देऊन सदरील स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासंदर्भात चर्चा केली.

यावेळी राज्याचे ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, विशेष पोलीस महानिरीक्षक एस. एम. लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्यासह शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5