Skip to content Skip to footer

अखेर प्रतीक्षा संपली! MPSC ची परीक्षा ४ सप्टेंबर रोजी होणार…

महाराष्ट्र बुलेटिन : ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान परीक्षा कधी होणार याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते. अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ४ सप्टेंबर २०२१ रोजी सदर परीक्षा घेतली जाईल, असा निर्णय घेतला आहे. आयोगाने यासंदर्भात एक परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना सूचित केले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत शासनाने वेळोवेळी केलेल्या उपाययोजना लक्षात घेऊन आयोगाकडून वेळोवेळी परीक्षेच्या आयोजनाच्या बाबतीत आढावा घेतला जाईल. ही माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध केली जाईल. यासाठी आयोगाच्या वेबसाईटला नियमितपणे भेट देणे हे उमेदवारांच्या हिताचे असेल, असे परिपत्रकात म्हटले आहे.

 

दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचे वय वाढत असून ते परीक्षेसाठी अपात्र ठरत आहेत. त्यामुळे लवकर परीक्षा घेण्यात यावी जेणेकरून पुढील परीक्षा देण्यासाठी ते वयात बसतील असा सूर अनेक विद्यार्थ्यांचा या दरम्यान दिसून आला. तसेच पुणे सारख्या शहरात राहून परीक्षार्थी अभ्यास करत असतात, त्यासाठी त्यांना अधिकचा पैसा लागत असतो. कोरोनामुळे आधीच आर्थिक बाबतीत सगळ्यांचे कंबरडे मोडले असताना केवळ परीक्षेसाठी शहरात राहून अभ्यास करणे विद्यार्थ्यांना परवडत नाही. त्यामुळे लवकर परीक्षा घेण्यात यावी असे विद्यार्थ्यांचे मत होते.

विशेष म्हणजे राज्यातील जवळपास चार लाख उमेदवार गेल्या दोन वर्षांपासून परीक्षेची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. एमपीएससीने संयुक्त परीक्षेसाठी आपत्ती आणि पुनर्वसन विभागाकडे ‘नाहरकत प्रमाणपत्र’साठी पत्रव्यवहार देखील केला होता. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन वॉर्ड, मदत आणि पुनर्वसन, महसूल आणि वन विभागाकडून ३ ऑगस्ट २०२१ च्या पत्राद्वारे मिळालेल्या अभिप्रायानुसार, परीक्षा ४ सप्टेंबर रोजी घेतली जाईल.

Leave a comment

0.0/5