महाराष्ट्र बुलेटिन : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोलीच्या बी. जे. एस. कॉलेज येथे शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली आबा कटके यांनी स्वखर्चातून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु केली आहे. सदर मोहिमेच्या माध्यमातून गेल्या आठ ते नऊ दिवसात तीन हजारांहून अधिक नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. विशेष म्हणजे नागरिकांच्या मागणीवरून ही मोहीम अशीच सुरु ठेवली जाणार आहे. त्यामुळे लसीकरणापासून वंचित राहिलेल्या सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
या लसीकरण मोहिमेद्वारे परिसरातील पाच ते सहा हजार नागरिकांना पहिल्या टप्प्यात मोफत लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्ये ठेवण्यात आले होते, ते अवघ्या आठ दिवसातच तीन हजार पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करून साध्य होताना दिसत आहे. ज्ञानेश्वर कटके यांच्यामार्फत सदर लसीकरण केंद्रावर अतिशय नियोजनपूर्वक व कोरोनाच्या सर्व संरक्षणात्मक नियमांतर्गत लसीकरण केले जात असून डॉक्टर, परिचारिका तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याद्वारे नियोजनबद्ध मोहीम राबविली जात आहे.
विशेष म्हणजे वाघोली येथील जनसंपर्क कार्यालयात नाव नोंदणी केल्यानंतर संबंधित नागरिकांना फोनद्वारे लसीकरणाचा दिवस व वेळ कळविली जात आहे. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध होणाऱ्या या लसीकरण मोहिमेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान जोपर्यंत वाघोलीतील प्रत्येक नागरिकांचे लसीकरण होत नाही तोपर्यंत सदर मोहीम सुरु ठेवण्यात येईल असे आयोजकांडून समजले आहे. तसेच माऊली आबांनी फक्त बोलून नाही तर करून दाखवले असे मत येथील नागरिकांनी मांडले आहे.