महाराष्ट्र बुलेटिन : टोकियो ऑलिम्पिकमधून भारताच्या शिरपेचात आणखी एक पदक रोवणारे रवी कुमार दहिया यावेळी कुस्तीचे नवे ‘पोस्टर बॉय’ बनले आहेत. २३ वर्षीय कुस्तीपटू रवी टोकियोमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकणारे पहिले भारतीय पुरुष खेळाडू आहेत. संपूर्ण देश त्यांच्या कामगिरीला सलाम करत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रवीकुमार यांचे वडील भाडेतत्त्वावर जमीन कसत होते
रवी हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील नहरी गावातील रहिवासी आहेत. एका गरीब कुटुंबात जन्मलेले रवीचे वडील शेती करायचे, पण त्यांच्याकडे स्वतःची जमीनही नव्हती. ते भाडोत्री जमिनीवर शेती करायचे. आर्थिक अडचणी असूनही वडील राकेश यांनी आपल्या मुलाच्या प्रशिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही. दररोज ते आपल्या गावापासून छत्रसाल स्टेडियमपर्यंत ४० किलोमीटरचा प्रवास करून रवी कुमार यांना दूध आणि फळे पोहोचवायचे.
छत्रसालमध्ये घेतले कुस्तीचे प्रशिक्षण
वयाच्या १० व्या वर्षापासून रवीने दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेतले. छत्रपाल स्टेडियममध्ये रवी यांनी सुशील कुमार, योगेश्वर दत्तसारख्या खेळाडूंना खेळताना पाहिले. छत्रसाल स्टेडियममधून प्रशिक्षण घेतल्यानंतर रवी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बनले. सतपाल सिंह आणि वीरेंद्र कुमार हे रवी दहियाचे प्रशिक्षक आहेत. २०१५ मध्ये छत्रसाल स्टेडियमच्या सुप्रसिद्ध कुस्तीपटूच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण सुरू केल्यानंतर त्यांनी प्रथम जागतिक कॅडेट चॅम्पियनशिपचा भाग बनून आपले कौशल्य जगाला दाखवले.
कुस्तीचे ‘पोस्टर बॉय’ बनण्याचा प्रवास
२०१५ च्या ज्युनियर वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये रवी कुमार यांची प्रतिभा दिसून आली. त्यांनी ५५ किलो गटात रौप्य पदक जिंकले. पण उपांत्य फेरीत त्यांना दुखापत झाली. त्यानंतर सिनियर वर्गात करिअर बनवताना त्यांना दुखापतीमुळे माघार देखील घ्यावी लागली. २०१७ च्या सिनियर नॅशनल्समध्ये दुखापतीमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. यामुळे त्यांना काही काळ मॅटपासून दूर राहावे लागले व त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी सुमारे एका वर्षाचा काळ लागला.
तथापि, दुखापतीमुळे घ्याव्या लागणाऱ्या ब्रेकनंतर त्यांनी तेथूनच वापसी केली जेथून ते परतले होते. रवी यांनी बुखारेस्ट येथे २०१८ च्या वर्ल्ड अंडर २३ रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये ५७ किलो कॅटेगरीमध्ये रौप्यपदक जिंकले. रवीसाठी २०२० देखील खूप चांगले ठरले. कोरोनापूर्वी मार्चमध्ये दिल्लीत झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. आता टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचल्यावर रवी भारतीय कुस्तीचे नवे ‘पोस्टर बॉय’ बनले.