महाराष्ट्र बुलेटिन : समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक जीवन आणि पत्रकारिता यात सामान्य माणसाला प्रतिबिंबित करणारे ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची आर्ट गॅलरी पुण्यात आकार घेत आहे. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांतून बालेवाडी येथे या आर्ट गॅलरीचे काम पूर्णत्वास येत आहे.
यावेळी प्रभागातील नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याशी सदर विषयाला अनुसरून संवाद साधण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, आर. के. लक्ष्मण यांच्या स्नुषा उषा लक्ष्मण यांच्या मोलाच्या सहकार्यातून स्मार्टसिटी अंतर्गत ही आर्ट गॅलरी बालेवाडीत साकार होत आहे. कॉमन मॅन आर. के. लक्ष्मण यांच्या या आर्ट गॅलरीची प्रतीक्षा सर्व पुणेकरांना असून लवकरच या आर्ट गॅलरीचे उद्घाटन माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते होईल. विशेष म्हणजे कॉमन मॅन आर. के. लक्ष्मण यांनी अनेक विषयांसह गणपती बाप्पावर देखील व्यंगचित्र काढली होती. त्यांची गणपती बाप्पांवर अपार श्रद्धा होती हे त्यांनी त्यांच्या व्यंगचित्रांमार्फत दाखवून दिले आहे, ते पाहून पुणेकरांना निश्चितच अभिमान वाटेल.
तसेच ते पुढे म्हणाले की भारतीय जनता पक्ष फक्त विकासाकामांमध्येच पुढे नाही तर आर. के. लक्ष्मण यांच्यासारख्या अतिशय भावनिक आणि कलात्मक व्यक्तींचे नाव जगामध्ये पोहोचवण्यासाठी देखील संवेदनशील आहे. म्हणूनच अशा प्रकारची वास्तू भारतीय जनता पक्षाच्या काळात उभी राहत आहे याचा मला फार अभिमान वाटतो, असे मत त्यांनी मांडले.
उषा लक्ष्मण यांनी देखील सदर कामामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ यांचे विशेष आभार मानले आहेत. तसेच बालेवाडीत बनत असलेल्या या आर्ट गॅलरीला प्रभागाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.