महाराष्ट्र बुलेटिन : काल दिनांक ९ ऑगस्ट रोजी सोमवारी वाघोलीत राज्य शासनाच्या आदेशानुसार लोणीकंद आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यांचा समावेश पोलीस आयुक्तालयात करण्यात आला. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कायदा सुव्यवस्थेसह विविध संप, निदर्शने, आंदोलने यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विशेष शाखा परिमंडळ -६ चे उद्घाटन करण्यात आले आहे.
वाघोली परिसरातील केसनंद फाटा येथे सदर उद्घाटन समारंभ अमिताभ गुप्ता (भा.पो.से. पोलीस आयुक्त, पुणे शहर) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गैर प्रकारांसह इतर घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी सदर कार्यालयाद्वारे कामकाज पाहिले जाणार आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके हे देखील उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि एक मास्टर प्लॅन तयार करून पोलिसांसाठी मध्यवर्ती कार्यालयाचे नियोजन करण्यात येणार आहे असे देखील सांगितले. यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, पं.स. सभापती नारायण आव्हाळे यांच्यासह इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.