Skip to content Skip to footer

किरकोळ चलनवाढ उच्चांकी पातळीवर

नवी दिल्ली – जून महिन्यात महागाईने डोके वर काढले असून, गेल्या पाच महिन्यांचा उच्चांक गाठल आहे. महागाई वाढल्याने औद्योगिक उत्पादनात घट झाली आहे. जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर पाच टक्‍क्‍यांपेक्षा अधिक राहिला तर मे महिन्यात हा दर ४.८७ टक्के इतका होता.

किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढ मे महिन्यात ४.८७ टक्के होती. गेल्या वर्षी जून महिन्यात ही १.४६ टक्के होती. या वर्षी जानेवारी महिन्यात ती ५.०७ टक्के या उच्चांकी पातळीवर गेली होती. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, खाद्यपदार्थांची महागाई जूनमध्ये २.९१ टक्के आहे. मे महिन्यात ती ३.१ टक्के होती. इंधन व विजेची महागाई ७.१४ टक्‍क्‍यांवर पोचली आहे. मे महिन्यात ती ५.८ टक्के होती. केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेला चलनवाढ ४ टक्‍क्‍यांवर नियंत्रित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील पतधोरण समितीची बैठक या महिन्यात होत आहे. या बैठकीत व्याजदरांचा आढावा घेण्यात येणार आहे. व्याजदरात कपात करताना समितीकडून प्रामुख्याने किरकोळ चलनवाढीचा विचार केला जातो.

Leave a comment

0.0/5