Skip to content Skip to footer

म्युचुअल फंडात चक्रवाढीची ताकद

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडं सर्वसामान्य नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील दीड ते दोन वर्षांच्या काळात गुंतवणूक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जर पीचवर जास्त काळ टिकून राहिलात, तर जास्त धावा निघू शकतात. त्याचप्रमाणं म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक ठेवली, तर भाववाढीवर मात करणारा चांगला परतावा तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये म्युच्युअल फंड असणे गरजेचं आहे,” असे मत “असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडिया’चे (ऍम्फी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एनएस वेंकटेश यांनी  व्यक्त केले. त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद…

प्रश्न : “ऍम्फी’च्या “म्युच्युअल फंड सही है!’ या मोहिमेनं बऱ्याच गुंतवणूकदारांचं लक्ष वेधलं आहे. पण, “म्युच्युअल फंड सही क्‍यू है’?
उत्तर : 
म्युच्युअल फंडविषयी गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी “म्युच्युअल फंड सही है!’ ही मोहीम हाती घेतली गेलीय. छोट्या आणि मध्यम वर्गातील गुंतवणूकदारांसमोर, गुंतवणुकीच्या अधिक परतावा देणाऱ्या संधी निर्माण करण्याचं काम म्युच्युअल फंड करत आहेत. म्युच्युअल फंडच्या साह्याने छोट्या गुंतवणूकदारांच्या पैशांची बचत होऊन त्या बचतीचं प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतर केलं जातं. त्यामुळं खास करून छोट्या गुंतवणूकदारांसाठी दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी “म्युच्युअल फंड सही है!’ क्रिकेटप्रमाणेच म्युच्युअल फंडात जर तुम्ही जास्त काळ टिकून राहिलात, तर भाववाढीवर मात करणारा चांगला परतावा मिळू शकतो. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओत “म्युच्युअल फंड’ असणे गरजेचं आहे.

प्रश्न : गुंतवणूकदारांचा सहभाग वाढावा यासाठी “ऍम्फी’ नवीन काय करतंय?
उत्तर : 
आम्ही “जन निवेश’ हा एक नवा कार्यक्रम हाती घेतलाय. त्यामध्ये पगारदारांनी त्यांचा एक दिवसाचा पगार म्युच्युअल फंडात गुंतविण्याची शपथ घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या सहा महिन्यांत एक कोटीहून अधिक लोकांना आम्ही शपथ घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या एक कोटी लोकांपैकी 20 टक्के लोकांनी जरी प्रत्यक्षात पैसे गुंतवले, तरी 20 लाख नवे गुंतवणूकदार जोडले जातील.

प्रश्न : “सेबी’ने म्युच्युअल फंडाच्या योजनांचे अलीकडेच नव्यानं वर्गीकरण केलंय. त्याचा काय फायदा होईल, असं तुम्हाला वाटतं?
उत्तर :
 “ऍम्फी’शी सल्लामसलत करून “सेबी’नं म्युच्युअल फंडाच्या योजनांचे वर्गीकरण केलंय. या वर्गीकरणामुळे पारदर्शकता निर्माण होणार आहे. म्युच्युअल फंडाच्या विविध प्रकारच्या योजना असतात. वर्गीकरणामुळे कोणता फंड कुठं गुंतवणूक करणार आहे, हे गुंतवणूकदारांना समजेल. परिणामी, आपल्या गरजेनुरूप योग्य योजनेची निवड करण्यास मदत होणार आहे. बदलाची ही सुरवात असून, गुंतवणूकदारांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन भविष्यात आणखी नवे प्रकार समोर येऊ शकतात.

प्रश्न : म्युच्युअल फंडच्या उत्पन्नावर या वर्षीपासून भांडवली नफा कर लागू करण्यात आला आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे?
उत्तर :
 म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीला करसवलत द्यावी, अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केली होती. परंतु, यंदाच्या अर्थसंकल्पात, सरकारने 10 टक्के दीर्घकालीन भांडवली नफा कर लादला गेला. तो अर्थमंत्रालयाचा किंवा सरकारचा अधिकार आहे. तरीही “सेबी’ आणि केंद्र सरकारकडे आम्ही करसवलतीची मागणी लावून धरणार आहोत.

प्रश्न : म्युच्युअल फंड उद्योगाने 24 लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचा (एयूएम) टप्पा गाठला आहे. यापुढील वाटचाल कशी वाटते?
उत्तर :
 म्युच्युअल फंड हा व्यवसाय खासगी क्षेत्राला खुला होऊन आता 25 वर्षे झाली. या दरम्यानच्या काळात म्युच्युअल फंड उद्योग 19 पटींनी वाढलाय. 1993 ते 2014 पर्यंत या उद्योगाचा एकूण “एयुएम’ 10 लाख कोटींच्या घरात होता. मात्र, 2017 च्या शेवटी त्यामध्ये दुपटीने वाढ होत 20 लाख कोटींची पातळी गाठली गेली. आताच्या वर्षाच्या मध्यापर्यंतच आपण 24 लाखांचा टप्पा गाठलाय. म्युच्युअल फंड व्यवसायात सरासरी 25 ते 26 टक्‍क्‍यांचा वृद्धीदर पाहायला मिळतोय. नजीकच्या काळातदेखील वृद्धीदर असाच राहिल्यास 2025 पर्यंत म्युच्युअल फंड व्यवसाय 100 लाख कोटींचा टप्पा सहज पार करेल.

प्रश्न : “एयुएम’ वाढविण्यात आणि “एक्‍स्पेन्स रेशो’ कमी करण्यात नव्या तंत्रज्ञानाची काय भूमिका असू शकते?
उत्तर :
 नव्या तंत्रज्ञानामुळे “ऑपरेशनल कॉस्ट’मध्ये मोठ्या प्रमाणात कपात करणे शक्‍य होणार आहे. साहजिकच, त्याचा फायदा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना होऊन जास्त परतावा मिळू शकेल. याबरोबरच, नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त गुंतवणूकदारांपर्यंत पोचणेदेखील सहज साध्य होईल. नवे तंत्रज्ञान हे म्युच्युअल फंड क्षेत्राच्या वाढीसाठी मोठी भूमिका बजावू शकते, हे शिखर संस्था म्हणून “ऍम्फी’च्या अगोदरच लक्षात आले आहे. म्हणूनच आम्ही “एमएफ युटीलिटीज’चा पर्याय गुंतवणूकदारांसमोर आणला आहे. यामार्फत विविध म्युच्युअल फंड कंपन्यांची विविध प्रकारची सेवा अतिशय सोप्या पद्धतीने एकाच छताखाली उपलब्ध झालीय.

प्रश्न : सर्वसामान्य बचतीचा म्युच्युअल फंडात वाटा किती असेल आणि त्याचं भवितव्य काय दिसतं?
उत्तर :
 मागील दीड ते दोन वर्षांच्या काळात गुंतवणूक पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. गुंतवणूकदारांचा कल सोने, स्थावर मालमत्ता आदी भौतिक गुंतवणूक साधनांकडून ठेवी, म्युच्युअल फंड आदी आर्थिक साधनांकडे वाढताना दिसतोय. सर्वसामान्य बचतीत म्युच्युअल फंडचा हिस्सा खूपच कमी आहे. मात्र, त्यात वाढ व्हावी, यासाठी “ऍम्फी’, “सेबी’ आणि इतर म्युच्युअल फंड कंपन्या प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत म्युच्युल फंड व्यवसाय प्रामुख्याने महानगरे आणि मोठ्या शहरांपुरता मर्यादित होता. मात्र, या व्यवसायाला निमशहरी आणि ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत नेण्यासाठी आम्ही पावले उचलली आहेत. यासाठी “म्युच्युअल फंड सही है!’ किंवा “जन निवेश’ यांसारखे उपक्रम राबवून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. त्यामुळे लवकरच म्युच्युअल फंडाचा सर्वसामान्य बचतीमध्ये असलेला 2 टक्‍क्‍यांचा हिस्सा 3.5 ते 4 टक्‍क्‍यांवर पोचेल, असे वाटते. सद्यःस्थितीत, भारतात म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे प्रमाण एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेत फक्त 11 टक्के आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण सरासरी 62 टक्के आहे. त्यामुळे भारतात म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत वाढ होण्यासाठी अधिक वाव आहे.

प्रश्न : शेवटी तुम्ही तरुणांना, विद्यार्थ्यांना आणि गृहिणींना काय सल्ला द्याल?
उत्तर ; 
सर्वांनाच माझा सल्ला आहे, की लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरवात करा. बचत करण्याची आणि गुंतवणूक करण्याची सवय तरुण वयातच लावून घ्या. जितक्‍या लवकर बचत आणि गुंतवणुकीची सवय लावाल, तितके चांगले. “चक्रवाढीची ताकद’ हे जगातील आठवं आश्‍चर्य मानलं जातं. लवकर गुंतवणूक सुरू केली, तर याचा फायदा मिळू शकतो.

Leave a comment

0.0/5